Lok Sabha Election 2024 : भाजप तिसऱ्यांदा जिंकणार की…

आजमितीला देशातील ११ राज्यांत भाजप स्वबळावर आहे, तर ७ राज्यांत १ मित्रपक्षांसह सत्तेवर आहे. भाजपाची हीच मजबूत स्थिती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची वाट मोकळी करील.

197
Lok Sabha Election 2024 : भाजप तिसऱ्यांदा जिंकणार की...
Lok Sabha Election 2024 : भाजप तिसऱ्यांदा जिंकणार की...
 –   नित्यानंद भिसे
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि ६ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मात्र त्याच वेळी विरोधकांची चिंता वाढलेली आहे. भाजपचे सध्या सगळे ‘सेट’ आहे, पण त्याच वेळी विरोधकांची अजून घडी बसायला तयार नाही. येत्या २-३ महिन्यांत कधीही लोकसभेची निवडणूक जाहीर होऊ शकते. अशा वेळी सध्याची राजकीय स्थिती काय असणार हे पाहावे लागणार.

भाजपचा एकच नारा ‘हमारा नेता एक ही है’

आजमितीला देशातील ११ राज्यांत भाजप स्वबळावर आहे, तर ७ राज्यांत १ मित्रपक्षांसह सत्तेवर आहे. भाजपाची हीच मजबूत स्थिती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची वाट मोकळी करील, कारण या सर्व १८ राज्यांतील लोकसभेच्या एकूण जागांचा विचार केल्यास एकट्या भाजपने २०० जागा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकल्या होत्या. मित्रपक्षांसह हा आकडा २५० वर गेला होता. म्हणूनच ही सगळी राज्ये भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएसाठी महत्त्वाची आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा चेहरा एकच आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. (Prime Minister Narendra Modi) हमारा नेता एक ही है, असा भाजपचा नारा आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) लाटेवर स्वार होऊन भाजपने अक्षरशः विरोधकांचे पानिपत केले. कारण २०२३ मध्ये झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकही मुख्यमंत्री पदाचा चेहरा दाखवला नाही. भाजपने विधानसभा निवडणुकांमध्येही मोदींचा चेहरा दाखवून यश मिळवले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी आणि निवडणुकीच्या तोंडावर मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा ‘इव्हेंट’ यानिमित्ताने देशभरात आयोजित विविध कार्यक्रम, विविध राज्यांमधून लोकांना रामदर्शनाला नेण्याची घोषणा, यातून भाजपने हिंदू मतांचे आपल्या बाजूने ध्रुवीकरण करण्यात यश मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. (Lok Sabha Election 2024)
अब कि बार ४०० पार..
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी भाजपविरोधी सर्व पक्षांची मोट बांधून ‘इंडी’ आघाडी स्थापन केली आहे. परंतु त्याच वेळी भाजपने समविचारी ३८ पक्षांची मोट बांधून एनडीएला मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपने स्वतःच्या ३५० जागा, तर एनडीएसह ४०० जागा आणि देशभरात ५० टक्क्यांहून अधिक मते मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी भाजपला उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्ये महत्त्वाची आहेत. कारण मागील निवडणुकीत या राज्यांमध्ये भाजपने निम्म्यापेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या. इतर राज्यांमध्ये लक्ष केंद्रित करून आतापासून सभा, कार्यकर्ता मेळावे घेऊन वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. मागील निवडणुकीतील आकडेवारी पाहिल्यास, भाजपने ३०३ जागांवर विजय मिळविला होता. त्यात त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ३७.७ टक्के होती. भाजपला ३०३ पैकी २२४ मतदारसंघात ५० टक्क्यांहून अधिक, तर १०१ ठिकाणी ४० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. आता तर भाजपने ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. त्यानुसार, मागील तीन लोकसभा निवडणुकीत ज्या २०० जागांवर भाजपला विजय मिळवता आला नाही, तेथे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Maratha Reservation : कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अजित पवारांचा जरांगेंना इशारा)

विरोधकांमध्ये अजून एकमत होईना…
एका बाजूला भाजप पूर्ण तयारीनिशी निवडणुकीला सामोरे जाण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे मोदींसारखे आव्हान समोर असताना विरोधकांनी जी ‘इंडी’ आघाडी स्थापन केली आहे त्यात अजून एकमत होताना दिसत नाही. आधी या आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी (Rahul Gandhi) करतील, अशी चर्चा सुरु होती. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव समोर आले आणि आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव चर्चेत येत आहे. अशा प्रकारे या आघाडीचे नेतृत्व कोण करणार हेच अजून निश्चित होत नाही. दुसरीकडे आघाडी झाली तर पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब आणि दक्षिणेतील राज्ये काँग्रेसला किती जागा सोडतील त्यावर साशंकता असल्याने या आघाडीत काँग्रेस शेवटपर्यंत राहणार की २०१९ सारखे काँग्रेस स्वबळावर लढणार, अशी स्थिती बनली आहे. (Lok Sabha Election 2024)
काँग्रेस मोठेपणा सोडणार का?
सलग दोन लोकसभा निवडणुकांमधील पराभवाची मरगळ झटकण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘भारत जोडो यात्रा’ काढली. त्यानुसार देशभरात भाजपविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्नही केला. पण भाजप राहिले बाजूला, इतिहासातील व्यक्तिमत्व, धार्मिक गोष्टी यांवर टीकाटिप्पणी करून राहुल गांधी (Rahul Gandhi) लोकप्रियता मिळवण्यापेक्षा वादात जास्त सापडले. पण तरीही या यात्रेनंतर काँग्रेसला कर्नाटकातील विधानसभेत चांगले यश मिळाले आणि तिथे काँग्रेसने सत्ता मिळवली. शिवाय नुकत्याच झालेल्या तेलंगणाच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस अथवा कोणताही विरोधी पक्ष हा एकट्याने भाजपचा विजयाचा रथ रोखू शकत नसल्याची जाणीव असल्याने २८ मित्रपक्षांनी एकत्र येत ‘इंडी’ आघाडीची स्थापना केली. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकूण १४० जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी सध्या देशातील ९ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात सत्ता असलेल्या आघाडीने या राज्यांमधून केवळ ८९ जागा जिंकल्या होत्या, एकट्या काँग्रेसचा विचार केल्यास, काँग्रेसने लोकसभेच्या ५४३ पैकी ४२२ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी केवळ ५२ जागांवर विजय, तर २०९ जागी दुसऱ्या क्रमाकांची मते मिळविली होती. ‘इंडी’ आघाडीसोबत निवडणूक लढवताना, काँग्रेसला उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, दिल्ली-पंजाबमध्ये आप, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा), बिहारमध्ये जेडीयू/राजद, तर अन्य राज्यांतही इतर प्रादेशिक पक्षांसोबत जागावाटपासाठी तडजोड करावी लागणार आहे, त्यासाठी काँग्रेस किती प्रमाणात सकारात्मक असेल हे आज तरी सांगता येणार नाही. (Lok Sabha Election 2024)
२०२४ मध्ये कोणत्या राज्यात कधी होणार निवडणुका?
– सप्टेंबर २०२४ जम्मू-काश्मीर (राष्ट्रपती शासन)
– ऑक्टोबर २०२४ हरियाणा (भाजप)
– ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्र (महायुती)
– एप्रिल २०२४ आंध्र प्रदेश (वायएसआर काँग्रेस)
– एप्रिल २०२४ सिक्कीम (क्रांतिकारी मोर्चा)

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.