Prakash Ambedkar : वंचितचा मविआला शेवटचा इशारा; प्रकाश आंबेडकर म्हणाले, चळवळीला संपवण्याचा प्रयत्न

169

मागील दोन महिन्यांपासून मविआकडून वंचितला महाआघाडीत सामावून घेण्याबाबतचे घोंगडे भिजत ठेवले आहे. अखेरीस काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली, दोन दिवसांत उबाठा गटाचीही उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. असे असताना वंचितबाबत अद्याप निर्णय होत नाही, त्यामुळे अखेरीस वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्हिडीओ जाहीर करत, मविआला अंतिम इशारा देत, चळवळीला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे कार्यकर्त्यांना सांगत वंचित जी भूमिका घेईल ती मान्य करा, असे आवाहन केले आहे.

(हेही वाचा Bharat हे हिंदू राष्ट्र होते, आहे आणि राहणार – मिलिंद परांडे)

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 

वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या मतदारांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे आवाहन, अशा शीर्षकाखाली वंचित आघाडीकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी वंचित आघाडीने युतीबाबत काय केले पाहिजे, याबाबतचा सल्ला दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी मीही मान्य करणार नाही. निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाहीत. मात्र आता चळवळीलाच लाचार केले जात आहे आणि लाचार करून संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही कदापीही मान्य करणार नाही, असे म्हणत आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अप्रत्यक्षरित्या मविआला इशारा दिला आहे. आपल्या समर्थकांना आवाहन करताना प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, मी सर्व शाहू-फुले-आंबेडकरवादी मतदाराला सांगतो की, काही गोष्टी उघड बोलू शकत नाही, मात्र काही ठिकाणी आपण जिंकणार आहोत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चळवळीचा विचार हा सर्वांत महत्त्वाचा आहे. आपण सार्वजनिक जीवन जगतो आणि जो सार्वत्रिक निर्णय आहे, त्याला आपण सर्वांना मान्य केले पाहिजे. तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल, त्या भूमिकेला शाहू-फुले-आंबेडकरी विचाराच्या प्रत्येकाचा पाठिंबा असेल, असे मी गृहित धरतो, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.