पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणातील हिसार येथून अटक करण्यात आलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिने पाकिस्तानचे भरभरून कौतुक केले. ज्योती म्हणते, मला पाकिस्तानी लोकांनी खूप प्रेम दिले. तिने पाकिस्तानातील आठवणी तिच्या डायरीत लिहून ठेवल्या आहेत. पोलिसांनी तिची डायरी जप्त केली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्योती (Jyoti Malhotra) अनेकदा तिच्या वैयक्तिक डायरीत तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचे अनुभव लिहित असे. हीच डायरी तपासात मोठ्या प्रमाणात मदत करू शकते, असा आता तपास अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो आहे. ज्योतीने दोनदा पाकिस्तानला भेट दिली. २०२४ मध्ये जेव्हा ज्योती १० दिवसांसाठी पाकिस्तानला गेली होती, तेव्हा भारतात परतल्यानंतर तिने तिच्या वैयक्तिक डायरीत पाकिस्तानबद्दल दोन पाने लिहिली होती. त्यात पाकिस्तानचे तिने गुणगान गायले आहेत. यासोबतच भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबद्दलही मतेही मांडली आहेत.
ज्योतीने (Jyoti Malhotra) लिहिले, “माझी १० दिवसांची पाकिस्तान भेट पूर्ण केल्यानंतर, आज मी भारतात परतली आहे. सीमांमधील अंतर किती काळ राहील हे आम्हाला माहित नाही, परंतु मनातील द्वेष भावना पुसून टाका. आपण सर्व एकाच भूमीचे, एकाच मातीचे आहोत.” तिने पुढे लिहिले की लाहोरला भेट देण्यासाठी दोन दिवस खूप कमी वेळ होता.
(हेही वाचा Jyoti Malhotra आणि आयएसआय एजंटचे चॅट्स समोर; “अटारी बॉर्डरवर कुणी अंडर कव्हर…”)
ज्योतीने (Jyoti Malhotra) तिच्या डायरीत पाकिस्तानमध्ये मिळालेल्या आदरातिथ्याचे कौतुक केले आणि आशा व्यक्त केली की अधिकाधिक भारतीय हिंदू तेथे त्यांच्या पूर्वजांना भेटू शकतील. यासोबतच, युट्यूबरने १९४७ च्या फाळणीदरम्यान पाकिस्तानात स्थायिक झालेल्या कुटुंबांसाठी मंदिरे आणि गुरुद्वारांचे दरवाजे उघडण्याची इच्छा देखील लिहिली.
मोबाईल फोनमुळे सत्य उघड होऊ शकते
युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे. एनआयए, आयबी तपास संस्था आणि हरियाणा पोलिसांकडून तिची सतत चौकशी केली जात आहे. या काळात दररोज नवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी सांगितले की, ज्योती तपासात अडथळे निर्माण करण्यासाठी काही दिशाभूल करणारी विधाने देखील करत आहे. ज्योतीने (Jyoti Malhotra) पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या आयएसआय एजंट दानिशशी असलेल्या तिच्या संबंधांना तिने नकार दिला आहे. त्या युट्यूबरने तिचे आणि दानिशचे व्हॉट्सअॅप चॅट्स देखील डिलीट केले आहेत. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, या गप्पा पाकिस्तानला दिलेल्या गुप्तचर माहितीचा भाग असू शकतो. म्हणूनच तिचा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community