-
प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना घडली असून, शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) माजी आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांनी आपल्या कुटुंबासह भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पंडित पाटील यांच्यासह त्यांचे पुतणे ॲड. आस्वाद पाटील आणि स्नुषा चित्रा पाटील यांचा १६ एप्रिल रोजी भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे शेकापला मोठा धक्का बसला असून, रायगडच्या राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
भाजपाचे (BJP) प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी सांगितले की, “पंडित पाटील हे अनुभवी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशाने रायगडमध्ये भाजपाची (BJP) ताकद वाढेल.” पंडित पाटील हे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू आहेत. त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपामध्ये सामील झाले असल्याने अलिबाग तालुक्यात शेकापची पकड कमकुवत होण्याची भीती आहे. विशेष म्हणजे, ॲड. आस्वाद पाटील हे माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र, तर चित्रा पाटील या माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आहेत. या तिन्ही दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशाने शेकापच्या गडाला घरातच खिंडार पडले आहे.
(हेही वाचा – Indian Share Market : डिसेंबर २०२५ पर्यंत भारतीय सेन्सेक्स ८३,००० हजारांवर असेल; जागतिक संशोधन कंपनीचा अंदाज)
पंडित पाटील यांनी शेकापवर नाराजी व्यक्त करताना म्हटले, “मागील निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन पक्षाने केले नाही. आता माझ्या अनुभवाचा उपयोग भाजपच्या संघटनेसाठी होईल.” त्यांनी दावा केला की, त्यांच्या प्रवेशाने रायगडमध्ये भाजप अव्वल स्थानावर येईल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम दिसेल. या विधानाने शेकापच्या नेतृत्वाला आव्हानच दिले आहे.
हा पक्षप्रवेश शेकापसाठी धक्कादायक आहे, कारण पंडित पाटील यांचा रायगडमध्ये मोठा जनाधार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, यामुळे शेकापची ताकद कमी होऊन भाजपला रायगडमध्ये मजबूत पकड मिळू शकते. याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासाठीही ही घडामोड अडचणीची ठरू शकते, कारण रायगडमध्ये भाजपची वाढती ताकद त्यांच्या प्रभावाला आव्हान देऊ शकते. रायगड जिल्ह्यात शेकापचे वर्चस्व दीर्घकाळ राहिले आहे. मात्र, या पक्षप्रवेशाने भाजपाचे (BJP) वजन वाढण्याची शक्यता आहे. शेकापच्या घरातच फूट पडल्याने पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जयंत पाटील यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांना आता नव्याने रणनीती आखावी लागेल. या घडामोडींमुळे रायगडच्या राजकारणात नवे समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे, आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा लाभ मिळू शकतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community