Indus Water Treaty : भारत-पाकिस्तान दोन्ही देशांत सिंधू जलकरारा(Indus Water Treaty)वरून वाद सुरू असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तुळबुल प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची मागणी केली. तर दुसरीकडे, पीडीपी नेत्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ओमर अब्दुल्लाह यांच्यावर टीकास्त्र सोडल्याचे समोर आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील वुल्लर सरोवरावरील दीर्घकाळ रखडलेल्या तुळबुल नेव्हिगेशन बॅरेजच्या पुनरुज्जीवनावरून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यात एकच वाद उफाळून आला. दरम्यान, मुख्यमंत्री अब्दुल्लाह यांच्या मागणीवर मेहबूबा मुफ्तींनी खूप दुर्दैवी आणि धोकादायकपणे चिथावणीखोर असे संबोधत नवा वाद निर्माण केला.
भारत-पाकिस्तान संघर्षात पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्तींनी भारत सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेत निष्पाप काश्मीरी नागरिकांचा जीव गेला म्हणत आरडाओरड केली होती. तर दुसरीकडे मुख्यमंत्री अब्दुल्लाह यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री अब्दुल्लाह यांच्या तुळबुल प्रकल्पाच्या वादाला पुन्हा सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे आवाहन अत्यंत दुर्दैवी आहे, असे पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी ‘एक्स’वर म्हटले. तर दुसरीकडे, सिंधू कराराला सातत्याने विरोध करणाऱ्या अब्दुल्लाह यांनी असे म्हटले की, बॅरेज पूर्ण केल्याने अनेक फायदे होतील. यामुळे आम्हाला नेव्हिगेशनसाठी झेलमचा वापर करण्याचा फायदा मिळेल. विशेषतः हिवाळ्यात डाउनस्ट्रीम प्रकल्पांची वीज निर्मिती देखील सुधारेल, असे अब्दुल्लाह म्हणाले.Indus Water Treaty
Join Our WhatsApp Community