
-
ऋजुता लुकतुके
भारत आणि अमेरिका दरम्यानचा नवीन व्यापारी करार (Indo – US Trade Deal) आता दृष्टीपथात आहे. आणि लवकरच त्याची अधिकृत घोषणा होईल असं अमेरिकन व्यापारमंत्री स्कॉट बेसेंट (Scott Bessent) यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सीएनबीसी वाहिनीशी (CNBC channel) बोलतानाही अमेरिकेबरोबर नव्याने करार करणारा भारत हा पहिला देश असल्याचं म्हटलं होतं. ‘अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणांशी जुळवून घेण्यात आशियाई देशांनी पुढाकार घेतला आहे. आणि भारत त्यांच्यातही पहिला आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स भारत दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांची आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट झाली. तिथेही चर्चा पुढे सरकली आहे. त्यामुळे लवकरच हा करार प्रत्यक्षात येऊ शकतो,’ असं बेसेंट म्हणाले.
अमेरिकन सरकारच्या नवीन व्यापार धोरणानुसार, ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी २ एप्रिल रोजी चीन आणि भारतासह एकूण २६ देशांवर तिथून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावरील आयात शुल्क वाढवलं होतं. चीनवर सर्वाधिक ३४ टक्के तर भारतावरही २६ टक्के आयात शुल्क वाढवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी या आयात शुल्क वाढीला ९० दिवसांची स्थगितीही दिली.
(हेही वाचा – IPL 2025, Vaibhav Suryavanshi : धोनी, विराटकडून वैभवला काय मंत्र मिळाला?)
या दरम्यान आशियातील दक्षिण कोरिया, जपान आणि भारतासह अनेक देशांनी अमेरिकेबरोबर व्यापारी बोलणी सुरू केली आहेत. भारताचं एक पथक मागचा महिनाभर अमेरिकेत तळ ठोकून आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमणही अमेरिकेचा दौरा करणार आहेत. उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स गेल्या आठवड्यात भारतात होते. तेव्हा त्यांनीही भारत आणि अमेरिकन व्यापार विषयक करार (Indo – US Trade Deal) हा दोन्ही देशांत रोजगार निर्मिती आणि संधी निर्माण करण्याविषयी असेल, असं म्हटलं होतं. ‘भारताचा अमृतकाल प्रकल्प (Amrit Kaal Project) आणि अमेरिकेचा गोल्डन एज फॉर अमेरिका हा प्रकल्प हे सारखेच आहेत. रोजगार निर्मिती आणि देशाला प्रथम प्राधान्य देणारे हे प्रकल्प आहेत. ते एकमेकांना कसे जोडता येतील. आणि दोन देशांमध्ये नवीन व्यापारी धोरण राबवताना आयात शुल्कविषयक धोरण काय ठेवता येईल यावर आम्ही चर्चा केली,’ असं व्हान्स भारतातून परतल्यावर म्हणाले होते. (Indo – US Trade Deal)
अमेरिकन मालासाठी भारतीय बाजारपेठा खुल्या व्हाव्यात अशी अमेरिकेची इच्छा आहे. ट्रंप यांनी यापूर्वी भारताला ‘टफ निगोशिएटर’ म्हणजे जास्त आयात शुल्क आकारणारा देश म्हटलं होतं. पण, व्यापार कराराची बोलणी सुरू झाल्यानंतर ट्रंप यांचं भारताविषयीचं मत काहीसं मवाळ झालं आहे. (Indo – US Trade Deal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community