I.N.D.I.A च्या महाराष्ट्रातील बैठकीआधीच ठाकरे गटाने टाकला मिठाचा खडा; भलताच प्रस्ताव मांडून नव्या वादाला सुरुवात

158
I.N.D.I. A च्या महाराष्ट्रातील बैठकीआधीच ठाकरे गटाने टाकला मिठाचा खडा; भलताच प्रस्ताव मांडून नव्या वादाला सुरुवात

२०२४ च्या निवडणुकीत येनकेन प्रकारेण पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपाला सत्तेपासून दूर करावे, या एकमेव उद्देशासाठी देशात भाजप विरोधी पक्ष एकत्र आले असून त्यांच्या २ बैठकाही झाल्या आहे. आता तिसरी बैठक महाराष्ट्रात होणार आहे, मात्र त्याआधीच ठाकरे गटाने एक प्रस्ताव मांडून I.N.D.I. A आघाडीत मिठाचा खडा टाकला आहे. या प्रस्तावामुळे आघाडीत नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

काय आहे ठाकरे गटाचा ‘तो’ प्रस्ताव? 

इंडिया आघाडीचे संयोजक पद कोणत्याही पक्षाच्या पक्षप्रमुखाला देण्यात येऊ नये, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या गटाने मांडल्याचे समजते. त्यांच्या मते, पक्षप्रमुख लोकसभा निवडणुकीत आपापल्या पक्षांची रणनीती ठरवण्यात व्यस्त असतात. तिकीट वाटपापासून ते उमेदवार निवडीपर्यंत अनेक कामे त्यांना करावी लागतात. काही नाराज नेत्यांची मनधरणीही त्यांना करावी लागते. त्यामुळे इंडियाच्या संयोजकपदी एखाद्या पक्षप्रमुखाची निवड केली गेली, तर त्यांना या पदाला न्याय देता येणार नाही. त्यामुळे हे पद दुसऱ्या फळीतील एखाद्या नेत्याला दिले जावे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

(हेही वाचा Goa : गोव्याचे मणिपूर घडवण्याचे षडयंत्र; फादर बोल्मेक्स यांच्याकडून शिवरायांच्या अवमानानंतर आता पुतळाही फोडला)

इंडिया आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत बैठक होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजक पदावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. पण आता ठाकरे गटाने मांडलेल्या या भूमिकेवर या आघाडीतील इतर 26 पक्षांचे नेते कोणती भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे. ठाकरने संयोजक पदाविषयी केलेली सूचना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मुंबईतील बैठकीत या सूचनेवर गांभीर्याने विचार होण्याची शक्यता आहे. संयोजक पद एका व्यक्तीला देण्याऐवजी एखादी समिती स्थापन करून निर्णय घेतला जाईल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

नितीश कुमारांचे स्वप्न भंगणार?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इंडियाच्या संयोजक पदासाठी आग्रही आहेत. तशी त्यांनी इच्छाही बोलून दाखवली आहे. त्यामुळे हे पद त्यांना मिळण्याची चर्चा होती. पण आता ठाकरे गटाने वेगळा विचार मांडल्यामुळे नितीश कुमार यांचे संयोजक होण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत. नितीश कुमार जनता दलाचे पक्षप्रमुख नाहीत. पण त्यांच्या पक्षाची सर्व धोरणे व निर्णय तेच घेतात. याशिवाय ते बिहारचे मुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे ते संयोजक पदाला न्याय देतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.