-
स्वप्नील सावरकर
गेल्या काही दिवसांपासून नव्हे तर, बहुधा राजकीय पटलावर जबरदस्तीने उगवल्यापासूनच बालिश विधाने करण्यात अग्रेसर असलेले, सध्याचे हिंदुस्थानच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते (दुर्दैवाने), काही केल्या सुधारायचे नाव घेत नाहीत. वारंवार हसं होत होत आता तर, पप्पूसारखं नामाभिधानही त्यांना शरमलं आहे. लोकांनी तर आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना लाडानं पप्पू म्हणणंही सोडून दिलं आहे, कारण ते आज लाडाचं नव्हे तर शिव्यांचं प्रतीक बनलं आहे.
आज या बाटग्या (खरी काँग्रेस कधीच संपल्याने) काँग्रेसच्या ‘युवराजां’चा उल्लेख करण्यामागचे कारणही तसेच आहे.
(हेही वाचा – Ramban Indian Army Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे वाहन दरीत कोसळले ; ३ जवान हुतात्मा)
विरोधी पक्षनेता असा हेच दुर्दैव!
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने या महाराजांना ज्या कानपिचक्या दिल्या आहेत, त्या जर नीट अभ्यासल्या तर वर ‘दुर्दैवाने’ हा शब्द का वापरला हे तुमच्या लक्षात येईल. यापूर्वी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सर्वोच्च न्यायालयात चौकीदार चोर है प्रकरण माफी मागून कसंबसं मिटवलं होतं, हे आठवत असेलच. हा माणूस इतक्या वेळा थोबाडावर पडूनही सुधारत कसा नाही, हेच कळत नाही. किमान गप्प बसून तथाकथित गांधी घराण्याच्या ऐशोआरामाचा तरी लाभ घ्यावा, तर तेही नाही. कधी भारत जोडो म्हणत रस्त्यावर धावत काय सुटेल, कधी लोकसभेतच थेट पंतप्रधानांच्या गळ्यात गळे घालायला काय धजेल किंवा डोळे काय मारेल… काहीच कळत नाही या बाबाजीचं. अर्थात, यांच्या माताजींनीही काय वेगळे दिवे लावले नव्हते की या बाबाकडून तुम्ही-आम्ही फार अपेक्षा ठेवाव्यात.
तर, मुद्दा हा आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात वारंवार अवमानकारक वक्तव्ये करून प्रसिद्धीचा स्टंट करणाऱ्या या महाशयांना न्यायालयेही त्यांच्या घराण्याचे गुलामच वाटतात बहुधा! कारण, यापूर्वी या महाभागांनी स्वतः माफी मागून मान वाचवली असतानाही बेताल वक्तव्ये करण्याचा सिलसिला काही थांबत नाही. खरंतर, सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) यांना तांत्रिकदृष्ट्या खालच्या न्यायालयाच्या समन्सला स्थगिती दिली असली तरी या बाबांना जे झापलं आहे आणि निरीक्षण नोंदवलंय ते फार महत्त्वाचं आहे. ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्याशी आपण कसे वागतोय? असा सवाल न्यायालयाने केलाय. तसेच, आम्ही कोणालाही स्वातंत्र्यसैनिकांविषयी बाष्कळ, इतिहासाचा अभ्यास न करता बोलण्याची परवानगी देऊ शकत नाही. तसेच, भविष्यात असे काही विधान केले तर सुओमोटो म्हणजे आम्ही स्वतःहून दखल घेऊन कारवाई करू, असा इशाराच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचा सारांश काढायचा झाला तर यापुढे स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान हा एकप्रकारे सर्वोच्च न्यायालयाचाच अवमान ठरेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तेव्हा, राहुल गांधी आता तरी सुधारा आणि सावरकरांवरील जितके खटले सुरू आहेत, तिथे जाऊन लोटांगण घाला, हेच तुमच्या भविष्यासाठी योग्य ठरेल.
(हेही वाचा – 11th Admission : यंदा ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने होणार !)
हल्ल्यानंतरही विरोधक सुधारेना!
पण, सुधारतील तर ते राहुलबाबा कसले? न्यायालयाने जेव्हा जेव्हा यांना कानपिचक्या दिल्यात त्यानंतरही कुत्र्याचे शेपूट वाकडेच राहिल्याचे दिसते. आता तर यांच्या नेतृत्त्वाखालील विरोधक पुलवामापाठोपाठ पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरूनही देशविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे, पाकिस्तानी वाहिन्यांवर काँग्रेस, तिस्ता सेटलवाड, मणिशंकर अय्यर, (Mani Shankar Aiyar) यांची थेट नावे घेऊन तिथले पाकडे यांना आपले समर्थक असल्याचे सांगतात, तेच खरे आहे आणि आता न्यायालयांनीही खरंतर या वक्तव्यांची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी. अन्यथा, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावायला नको, असे म्हणायची वेळ येईल.
पहलगाममधील (Pahalgam) पर्यटकांच्या हत्येने अख्खा हिंदुस्थान चिडलेला असताना राहुल गांधींचे (Rahul Gandhi) अनेक बरळणारे व्हिडिओ सातत्याने सोशल मीडियावर ट्रेंडिंग होताना दिसत आहेत. खरंतर, एका बाजूला विरोधी पक्ष मोदी सरकारच्या पाठिशी उभे असल्याचे दाखले देतो आणि दुसरीकडे अत्यंत खालच्या पातळीवरची टीकाही करतोय. यावरून सक्षम नेता नसलेल्या, भरकटलेल्या विरोधी पक्षाला नकारात्मक राजकारणाशिवाय काहीच करता येत नाही, हे समस्त देशापुढे वारंवार येतंय. देश आधी की पक्ष? तर यांचं उत्तर पक्ष असेल आणि, पक्ष आधी की व्यक्ती? तर समस्त गुलामी मानसिकतेचे कार्यकर्ते गांधीनिष्ठा चरणी वाहताना दिसतील.
शेवटी, एकच उदाहरण समोर येते ते महाभारतातले. कवी मोरोपंतांनी स्वपरबळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला, या काव्यपंक्ती ज्यावरून लिहिल्या त्या मत्स्य नरेश विराट राजाचा मुलगा उत्तर याची कथा आठवते. पांडव रुप बदलून अज्ञातवासात विराट राजाच्या आश्रयास होते. तेव्हा हा राजपुत्र उत्तर सर्व बायकांत बसून स्वपराक्रमाच्या वल्गना करत राहिला. परंतु, जेव्हा कुरु सैन्य समोर आले, तेव्हा भीष्म, द्रोण, कर्णासारखे योद्धे पाहून त्याची बोबडी वळली आणि त्याची सारथी असलेल्या बृहन्नडा म्हणजे अर्जुनाला रथ माघारी वळवण्यासाठी आर्जवं करू लागला.
याचेच मार्मिक वर्णन मोरोपंतांनी आर्या या वृत्तात केले आहे –
कुरुकटकासि पहातां तो उत्तर बाळ फार गडबडला,
स्वपरबळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला…
शेवटी, हाच उत्तर महाभारताच्या अंतिम युद्धाच्या पहिल्याच दिवशी कामी आला, असे महाभारतात लिहिले आहे.
तात्पर्य, राहुल गांधी राजपुत्र उत्तर नाहीत, पांडवांच्या बाजूचे तर अजिबातच नाहीत, परंतु, बडबड मात्र अगदी तशीच आहे. तेव्हा तुम्हाला या सर्व लेखप्रपंचाचे ‘उत्तर’ मिळाले असेलच.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community