बावनकुळेंचा राष्ट्रवादीला झटका, या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

91

राज्यातील मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात आले आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबई भाजप अध्यक्षपदी आमदार आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर बावनकुळे यांनी पक्ष विस्ताराला जोरदार सुरुवात केली आहे.

शिवसेनेतील पदाधिकारी हे भाजपमध्ये सामील होत असतानाच आता अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे बाळापूर मतदारसंघातील माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी घड्याळ काढत कमळ हाती घेतलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

(हेही वाचाः ‘65 मे से 50 निकल गए, अब बस दो ही बचे है’, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला)

सिरस्कार यांचा भाजप प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. अखेर शनिवारी त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अकोल्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उरस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत 120 कार्यकर्त्यांनी देखील भाजपची वाट धरली आहे.

कोण आहेत बळीराम सिरस्कार?

अकोल्यातील बाळापूर मतदारसंघात माळी समाजाचे प्रमुख नेते म्हणून सिरस्कार यांची ओळख आहे. ते याआधी भारिप बहुजन महासंघाकडून बाळापूर मतदारसंघात सलग 10 वर्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने सिरस्कार अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बळीराम सिरस्कार यांच्या भाजप प्रवेशाचा भाजपला बाळापूर मतदारसंघात मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.