काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा भार आता लवकरच ‘या’ दलित नेत्याकडे

170

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या भाई जगताप यांना आता या पदावरून बाजुला करून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एका दलित नेत्यावर जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरु आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांचे नेतृत्व सक्षम असले तरी त्यांच्याविरोधात अनेक गट निर्माण झालेले आहेत. त्यामुळे मागील विधान परिषदेत क्रॉस वोटींगमुळे पराभव पत्कारावा लागणारे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यावर आता काँग्रेस पक्ष मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून मुंबई काँग्रेसला अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – संजय राऊतांचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज, गुरूवारी होणारी सुनावणी?)

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाल्यानंतर एकप्रकारे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संचार पहायला मिळाला होता. परंतु राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर काँग्रेस पक्ष हा आक्रमक होण्याऐवजी शांत बसलेला पहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मागील महिन्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापालिकेच्या प्रभाग रचनांबाबत आक्षेप नोंदवले. परंतु या सर्व प्रक्रियेत भाई जगताप कुठेच दिसले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण समोर आले आहे.

दरम्यान, यापूर्वी झालेल्या विधान परिषद सदस्यपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार असलेले भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांचा विजय सहज मानला जात असतानाच हंडोरे यांचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांच्या फुटलेल्या मतांबाबत चौकशी करण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडे मागणी होत आहे. याबाबत काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी व निरीक्षक यांनी याचा आढावाही घेतल्याची माहिती मिळत आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर आगामी सार्वत्रिक निवडणूक पाहता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताना दिसत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत हंडोरे यांचा झालेला पराभव हा दलित जनतेचा अपमान असल्याचा एकप्रकारे संदेश जनतेपर्यंत पोहाचल्याने जगताप यांच्या जागी हंडोरे यांना मुंबई अध्यक्ष बनवून याची परतफेड करण्याचा विचार असल्याचे बोलले जात आहे. मागील दोन दिवसांपासून हंडोरे हे दिल्लीत असून या दिल्लीतील भेटीनंतर त्यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा पक्ष सोपवण्याची शक्यता आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी झाल्यास विद्ममान अध्यक्ष जगताप हे सकारात्मक नसतील. त्यांना आघाडी करायची नसून स्वबळावर लढण्याचा त्यांचा निर्धार आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी हा बदल होणे आवश्यक असल्याने हंडोरे यांना मुंबई अध्यक्ष बनवून काँग्रेसने दलित बांधवांचा आदर केला असा संदेश देता येईलच. शिवाय पवारांना अपेक्षित असलेली आघाडीही करता येईल. त्यामुळे हंडोरेंना मुंबई अध्यक्ष बनवल्यास महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी बनवणे सोपे जाईल,असे काहींचे म्हणणे असून हा संदेश हायकमांडपर्यंत पोहोचल्यानेच हंडोरेंना दिल्लीचे आवताण आल्याचे बोलले जात आहे. या दिल्ली भेटीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेला पराभव आणि काँग्रेसेची फुटलेली मते यांचाही आढावा घेतला गेल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी जनार्दन चांदुरकर आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड या दलित नेत्यांनी मुंबई अध्यक्षपद भुषवले आहे.

हंडोरे हे दोन वेळा नगरसेवक तर दोन वेळा आमदार होते, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री होते, याशिवाय सन २०१४ ते २०२१पर्यंत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि डिसेंबर २०२०मध्ये ते मुंबई प्रदेश काँग्रेसचे प्रभारी होते. त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पद भुषवल्याने त्यांच्याकडे पक्ष संघटनात्मक बांधणीचा दांडगा अनुभव असल्याने त्यांना मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद देण्याचा विचार केला जात असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.