धारावीत गायकवाडांसमोर शिवसेनेचेच आव्हान

76

राज्यात तिन्ही पक्षांच्या आघाडीचे सरकार असले, तरी येत्या मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत धारावीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना असे चित्र पहायला मिळणार आहे. धारावीचा चेहरा म्हणून ज्यांची ओळख होती, त्या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले आहे. त्यामुळे प्रथमच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या विधानसभेत महापालिकेची निवडणूक लढली जाणार आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांना पुन्हा सहाही जागेवर आपले नगरसेवक निवडून आणत वडिलांना श्रद्धांजली वाहायची आहे, तर एकनाथ गायकवाड नसल्याने शिवसेनेने या विभागातील पंजाचे अस्तित्व संपवून टाकण्याचा निर्धार पक्का केल्याचे बोलले जाते.

काँग्रेसचे नवीन चेहरे पहायला मिळणार

मागील २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसचा एकमेव वकील शेख यांच्या रूपाने नगरसेवक होते. तर कॉंग्रेसने तिकीट नाकारल्याने विष्णू गायकवाड हे अपक्ष निवडून आले होते. पण २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा जो एकमेव नगरसेवक  होता, ते वकील शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले. पण ही जागा गमावल्यानंतर कॉंग्रेसचे बब्बू खान आणि गंगा माने हे दोन नगरसेवक निवडून आले. त्यामुळे वकील शेख याला न दिलेल्या उमेदवारीची चूक आता काँग्रेसला कळून चुकली आहे. परंतु एकनाथ गायकवाड यांचे निधन झाल्याने यंदा प्रथमच आपल्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या वर्षा गायकवाड यांनी जुनी टीम बाजूला करून नवीन टीम निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसचे नवीन चेहरे पहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा 1 कोटीचा रस्ता बांधला अन् उद्घाटनावेळीच खड्डा पडला)

शिवसेना विरुध्द काँग्रेस अशी लढत

या निवडणुकीत विद्यमान दोन जागा कायम ठेवतानाच अधिक जागा पारड्यात पाडून घेत पुन्हा एकदा धारावीवर गायकवाडांचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी वर्षा गायकवाड या मंत्रीपदाचा पूर्ण वापर करत आहे, महिला बचत गटांची आमिष दाखवणे तसेच काहींची कामे करत शिवसेना आणि भाजपच्या लोकांना फोडून आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यामुळे या विधानसभा मतदार संघात वर्षा गायकवाड या आमदार असल्या तरी त्यांचे नगरसेवकांच्या माध्यमातून साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपचे कमळ फुलू न देता शिवसेनेच्या धनुष्यबाणाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्नही गायकवाड यांच्याकडून सुरु आहे. त्यामुळे या मतदार संघात शिवसेना विरुध्द काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.