-
प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राजीनामा देणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळात येण्याचे मार्ग जवळपास बंद झाल्याचे संकेत आहेत. या प्रकरणातील गंभीर आरोप, तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळे मुंडे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर समोर आलेले धक्कादायक फोटो आणि व्हिडीओंमुळे प्रकरण अधिकच गाजले. त्यानंतर जनतेच्या आणि विरोधकांच्या दबावामुळे मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा खात्याचा तातडीने राजीनामा द्यावा लागला होता. पुढे त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलेले गंभीर आरोपही सार्वजनिक चर्चेचा विषय ठरले.
(हेही वाचा – “जर दहशतीचा कणा पुन्हा उभा राहिला तर…” ; PM Modi यांचा पाकला सूचक इशारा)
मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता जवळपास संपल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. दरम्यान, सध्या मुंडे इगतपुरी येथील विपश्यना ध्यान केंद्रात दाखल असून, मागील आठ दिवसांपासून ते ध्यानसाधनेत व्यस्त आहेत. दहा दिवसांच्या या विपश्यना शिबिरात मोबाईल वापर निषिद्ध असून, बाहेरील संपर्क पूर्णपणे बंद असतो. या काळात ते स्वतःला मनःशांतीसाठी वेळ देत आहेत, अशीही चर्चा आहे.
(हेही वाचा – महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचा ‘नो रिस्क’ फॉर्म्युला; BJP स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम)
मुंडेंनी (Dhananjay Munde) अलीकडच्या काळात अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना मुक्काम दिला आहे. बीड जिल्ह्यातील नियोजित दौरा त्यांनी अचानक रद्द केला होता. त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचा दौरा असतानाही मुंडे अनुपस्थित होते. त्याच वेळी ते त्यांच्या मुलीच्या फॅशन शोमध्ये सहभागी झाल्याचे वृत्त समोर आले होते. या सर्व घटनांमुळे मुंडेंनी जाणीवपूर्वक सार्वजनिक क्षेत्रापासून काहीसा अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. राजकीय व वैयक्तिक आयुष्यातील वाद, मंत्रीपदाचा गमावलेला अधिकार, आणि त्यानंतर आलेले वैचारिक मंथन – हे सगळं पाहता धनंजय मुंडेंचा राजकीय पुनरागमनाचा मार्ग सध्या तरी अधिकच कठीण झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community