तातडीने सर्वेक्षण करून पूरग्रस्तांना मदत करणार – फडणवीस

85

सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात, त्यातही चिमूर तालुक्यात झालेले नुकसान खूप मोठे आहे. शेतासह घरातही पाणी शिरल्यामुळे हानी झाली आहे. या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव (पेठ) येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

( हेही वाचा : परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरू)

चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास ५५ हजार हेक्‍टरवर शेतमालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे पाणी शेतात, तसेच घरात घुसले. यात घरांची पडझड झाली. सोयाबीन, कापसाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. ज्या घरांची अंशतः किंवा पूर्णतः पडझड झाली, अशा नागरिकांना प्रशासनातर्फे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आता पाणी ओसरत असल्याने नागरिक आपापल्या घरी परतत आहेत. नुकसानग्रस्तांना शासनाच्या वतीने त्वरित मदत देण्यात येईल. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. त्यासाठी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. अंतिम आकडेवारी आल्यावर जास्तीत जास्त मदत केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.

७०१ मिमी पावसाची नोंद

चिमूर तालुक्यामध्ये १ जून ते १९ जुलैपर्यंत सरासरी ७०१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. उमा, गोधनी नदी, तसेच सातनाला व हत्तीघोडा नाल्याला आलेल्या पुरामुळे ४१ गावे बाधित झाली. शिवाय, पुरामुळे नेरी, सिरपूर, कळमगाव, पांजरेपार, बाम्हणी, सावरगाव व मालेवाडा, वाढोणा तर महालगाव काळू या गावातील ६० कुटुंबे बाधित झाली असून, २०८ नागरिकांचे जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

५४७ घरांचे नुकसान

चिमूर तालुक्यात आलेल्या पुरामुळे खडसंगी, नेरी, चिमूर, मासळ, जांभूळघाट, भिसी व शंकरपूर या गावातील ५४७ घरे व ३८ गोठे अंशतः बाधित झाले असून, १७ घरे व ३ गोठे पूर्णतः पडली आहेत. कृषी विभागाकडून केलेल्या प्राथमिक तपासणीच्या अनुषंगाने ३३ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. नवतळा, चिखलापार, गदगाव या गावातील २३ जनावरांचे नुकसान झाले आहे. या भागात पुरामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांचे शोध व बचाव कार्य चंद्रपूर आपत्ती निवारण पथकाद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.