मुंबईतील खड्ड्यांबाबत भाजपाची ही मागणी

प्रत्यक्ष खड्ड्यांची पाहणी करुन वर्षानुवर्ष खड्ड्यांच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार कायमचा संपवावा.

82

मुंबईतील रस्त्यांचे खड्डे बुजवले असल्याचा दावा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला असला, तरी गणेशोत्सवादरम्यानही खड्ड्यांचे संकट कायम आहे. त्यामुळे आयुक्तांचा खड्डे बुजवल्याचा दावा पूर्णतः फोल असून
शहर व उपनगरातील सर्व खड्ड्यांचे ऑडिट करुन संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच दोषी कंत्राटदारांचा समावेश काळ्या यादीत करावा, अशी मागणी भाजपाचे महापालिका पक्षनेता व स्थायी समिती सदस्य व विनोद मिश्रा यांनी केली आहे.

भ्रष्टाचार कायमचा संपवावा

शहर व उपनगरात ज्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम झाले आहे, तिथे अपघातांचा धोका कायम असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत आयुक्त महोदयांनी खड्डे बुजवल्याचे मोठमोठे दावे न करता प्रत्यक्ष खड्ड्यांची पाहणी करुन वर्षानुवर्ष खड्ड्यांच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार कायमचा संपवावा, अशी मागणी मिश्रा यांनी आयुक्तांना केली आहे.

(हेही वाचाः 31 हजार खड्डे बुजवले, तरी मुंबईकरांचे पाय खड्ड्यातच अडकले)

मुंबईकरांची फसवणूक

मुंबई महापालिकेने ३३ हजार खड्डे बुजवल्याचा केलेला दावा फोल ठरला असून, यासाठी ५० कोटींचा निधी पालिकेने खर्च केला आहे. यात जवळपास एका खड्ड्यासाठी १५ हजार रुपये खर्च केले आहेत. या खड्ड्यांचे ऑडिट केले असता ९० टक्के खड्डे तसेच असून, गेली अनेक वर्षे मुंबईकरांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप विनोद मिश्रा यांनी केला आहे.

(हेही वाचाः खड्ड्यांमुळे प्रशासन आले शुद्धीवर, आता घेतला ‘हा’ निर्णय!)

दोषींवर कठोर कारवाई करावी

दरवर्षी मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात खड्ड्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात गणेशोत्सवादरम्यानही खड्ड्यांचे संकट कायम आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांना विनंती करण्यात येत आहे की, शहर-उपनगरातील सर्व खड्ड्यांचे ऑडिट करुन संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच दोषी कंत्राटदारांचा समावेश काळ्या यादीत करावा. चर बुजवण्यासाठीचे कंत्राट सुमारे ३५० कोटी रुपयांचे आहे. परंतु यातही पारदर्शकता नसून अत्यंत दर्जाहीन काम करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः चार वर्षांत ७ हजार कोटींची रस्त्यांची कामे, तरीही खड्डे आहेतच!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.