-
विशेष प्रतिनिधी
Delimitation Bill : महिला आरक्षण (Women Reservation) आणि परिसीमनाच्या मुद्द्यावरून देशाच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले असताना शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या महिला आरक्षणाशी संबंधित परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याचा एकमुखी ठराव शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील नंदनवन निवासस्थानी झालेल्या या बैठकीत पक्षाच्या सर्व १५ खासदारांनी विधेयकाच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली.
या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांनी रविवारीच दिल्लीत दाखल व्हावे, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. बैठकीत मंजूर झालेल्या ठरावाची प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल तसेच एनडीएच्या प्रमुख नेत्यांना पाठवण्यात येणार आहे.
या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग अप्पा बारणे, संदिपान भुमरे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि डॉ. ज्योती वाघमारे उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार मिलिंद देवरा आणि संजय दिना पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभाग घेतला.
(हेही वाचा – KDMC ॲक्शन मोडमध्ये; कल्याण-डोंबिवलीतील १५ प्रमुख रस्ते होणार अतिक्रमणमुक्त !)
संसदेचे विशेष अधिवेशन सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेत, तर बुधवार, २ डिसेंबर रोजी राज्यसभेत होणार आहे. या अधिवेशनात सरकारकडून घटनादुरुस्ती आणि परिसीमनाशी संबंधित विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. या विधेयकांमुळे महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. तसेच लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८१५ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असून, महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची संख्या ४८ वरून ७२ होऊ शकते. त्यामुळे संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होईल, असे शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना-भाजप युतीमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारधारेनुसार ‘नेशन फर्स्ट’ हीच शिवसेनेची भूमिका असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. एनडीएच्या बैठकीत शिवसेनेला नेहमीच महत्त्वाचे स्थान मिळाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था प्रगती करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे लोकसभेतील १३ आणि राज्यसभेतील दोन असे सर्व खासदार दोन्ही सभागृहांत विधेयकांच्या बाजूने मतदान करतील, असे त्यांनी जाहीर केले.
१९७६ पासून लोकसभा मतदारसंघांची संख्या गोठवण्यात आल्याने सध्याच्या परिस्थितीत एका खासदाराला सुमारे २० ते २५ लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करावे लागत आहे. ‘एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’ या लोकशाही तत्त्वानुसार मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ग्रामीण आणि शहरी भागांचा समतोल विकास साधण्यासाठी तसेच नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधींपर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी परिसीमन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिसीमन आणि महिला आरक्षणाशी (Women Reservation) संबंधित संविधान दुरुस्ती विधेयकांच्या समर्थनार्थ शिवसेनेने घेतलेली भूमिका आगामी संसदीय अधिवेशनात महत्त्वाची ठरणार आहे. या निर्णयामुळे लोकशाही अधिक व्यापक आणि बळकट होईल, तसेच देशाच्या राजकीय व्यवस्थेत नवे परिवर्तन घडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

