प्रतिनिधी
Pratap Sarnaik : राज्यातील वाढत्या वाहनसंख्येमुळे दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासन लवकरच “एकात्मिक पार्किंग धोरण” लागू करणार आहे. त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) अंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी 19 मे रोजी दिली. एमएमआरडीएच्या क्षेत्रीय महापालिका आयुक्तांच्या बैठकीत ते बोलत होते. (Pratap Sarnaik)
(हेही वाचा – Neeraj Chopra : नीरज चोप्राने मानले पंतप्रधान मोदींचे आभार; कामगिरीत सातत्य राखण्याचं दिलं वचन)
मंत्री सरनाईक म्हणाले, “मुंबईसारख्या महानगरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी, सार्वजनिक जागांचे अतिक्रमण व नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या समस्येला सामोरे जाण्यासाठी एकात्मिक, शाश्वत आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज धोरण अत्यावश्यक आहे.” ते पुढे म्हणाले की, “पार्किंगसाठी जागा नसलेल्या वाहनधारकांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्वीकारावी. त्यासाठी महापालिकांनी उद्यान, मैदान यांच्या तळभागात पार्किंगची रचना करावी. ठाणे महापालिकेने याचे यशस्वी उदाहरण सादर केले आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, हे धोरण प्रथम मुंबई महानगर क्षेत्रात प्रभावीपणे राबवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्रत्येक महापालिकेच्या अडचणी, सूचना व अभिप्राय विचारात घेऊन अंतिम मसुदा तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. बैठकीत अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलीस आणि मोटार परिवहन विभागाच्या समन्वयातून टोईंग मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले. “विकास आराखड्यातील आरक्षित जागांवर पार्किंग प्लाझा उभारावेत. मुंबई महापालिकेचे पार्किंग प्लाझा धोरण इतर महापालिकांनीही आत्मसात करावे,” असा सल्ला त्यांनी दिला.
(हेही वाचा – School Issue in Village : राज्यात शिक्षणाचा अंधार! तब्बल 8 हजार गावे शाळेविना, मुलांच्या आरोग्यावरही धोका)
पार्किंगची जागा ही आता शहर नियोजनाचा अपरिहार्य भाग ठरली असून, धोरणात्मक दृष्टिकोनातून राज्य सरकार ठोस पावले उचलणार असल्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी बैठकीच्या समारोपात दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित महापालिका आयुक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community