Radhika Khera : ‘माझ्या खोलीत येऊन त्यांनी दरवाजा बंद केला आणि…’ ; नेत्यांच्या गैरवर्तनामुळे काँग्रेस सोडली; काय म्हणाल्या राधिका खेडा?

प्रियंका गांधी 'लडकी हू लड सकती हूं' असं केवळ म्हणू शकतात. परंतु, पक्षातीलच महिलेवर अत्याचार होत असेल तर त्या मौन धारण करतात. मी ट्विट करून प्रियंका गांधी यांच्याकडे न्याय मागितला. त्यांनी आश्वासन दिले. परंतु, पुढे काहीही झाले नाही, असे खेडा म्हणाल्या.

247

काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या राधिका खेडा (Radhika Khera) यांनी छत्तीसगडमधील नेत्यांवर गंभीर आरोप करीत काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या नेत्यांनी आपल्याशी अभद्र वर्तणूक केली. त्याविषयी आपण हायकमांडकडे तक्रारही केली. परंतु हायकमांडने त्याकडे दुर्लक्ष केले, यामुळे आपण काँग्रेस सोडली असा खळबळजनक दावा खेडा यांनी केला.

काय घडले त्या संध्याकाळी? 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत मी सहभागी झाले होते. त्यावेळी यात्रा छत्तीसगड राज्यात पोहोचल्यानंतर काँग्रेस नेते सुशील आनंद शुक्ला यांनी मला मद्य पिण्याची ऑफर दिली होती. तसेच रात्री नशेत चार-पाच कार्यकर्त्यांना घेऊन ते माझे दार वाजवत होते, असा खळबळजन आरोपही खेरा यांनी केला आहे. संध्याकाळी सहा वाजता पक्षाच्या कार्यालयात मी काही काम करीत होते. तेव्हाच छत्तीसगड काँग्रेसचे प्रवक्ते सुशील आनंद शुक्ला त्यांच्या दोन सहकारी नितीन भन्साळी आणि सुरेंद्र वर्मा यांच्यासोबत खोलीत आले. ते मला मद्य पिण्याची ऑफर करू लागले. त्यांच्यापैकी एका साथीदाराने मागून खोली बंद केली. खोली कोणी बंद केली ते मला समजले नाही, पण खोली बंद असल्याचा आवाज येताच मी माझा फोन काढला आणि कॅमेरा चालू केला. मी ओरडले. यानंतर मी बाहेर आले आणि सर्वांना या घटनेची माहिती दिली. मात्र या घटनेला सहा दिवस उलटल्यानंतरही दोषींवर  कारवाई झाली नाही. यामुळे मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, असे राधिका खेडा (Radhika Khera)  म्हणाल्या.

(हेही वाचा Congress सत्तेवर आल्यास राम मंदिराचा निर्णय बदलणार; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा खळबळजनक दावा)

हायकमांडकडे तक्रार केली

राधिका खेडा (Radhika Khera)  यांनी या प्रकरणाची तक्रार काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, छत्तीसगड काँग्रेसचे प्रभारी सचिन पायलट, आणि जयराम रमेश यांच्याकडे केली. परंतु, हायकमांडने सुध्दा या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. केवळ पवन खेडा यांनीच फोन करून विचारपूस केली आणि कारवाईचे आश्वासन दिले. पण त्याच्या हातात फार काही नाही. त्यामुळेच त्यांना इच्छा असूनही काही करता आले नाही.

राधिका खेडा यांनी प्रियांका गांधी यांचाही समाचार घेतला. प्रियंका गांधी ‘लडकी हू लड सकती हूं’ असं केवळ म्हणू शकतात. परंतु, पक्षातीलच महिलेवर अत्याचार होत असेल तर त्या मौन धारण करतात. मी ट्विट करून प्रियंका गांधी यांच्याकडे न्याय मागितला. त्यांनी आश्वासन दिले. परंतु, पुढे काहीही झाले नाही.

शुक्ला हा भूपेश बघेल यांचा खास  

सुशील आनंद शुक्ला हा भूपेश बघेल यांचा खास माणूस आहे. त्यांनीच सुशील आनंद शुक्ला यांना बढती दिली आहे. आणि भूपेश बघेल हे छत्तीसगड काँग्रेसमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. म्हणूनच शुक्लावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोपही खेडा (Radhika Khera) यांनी केला.

काँग्रेसच्या मुख्यालयात महिलांशी गैरवर्तन

काँग्रेसचे राज्यातील कार्यालय सोडा. काँग्रेसचे मुख्यालय सुध्दा महिलांसाठी सुरक्षित नाही. प्रियंका गांधी यांच्यासाठी काम करणाऱ्या एका मुलीला मोठया नेत्याने मुख्यालयातच मारहाण केली. यात संदीप सिंगचाही समावेश आहे.  मात्र कुणावरही कारवाई झाली नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.