मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न अखेर महापालिका मुख्यालयाऐवजी ‘वर्षा’वर झालेल्या बैठकीत सुटला. आजवर महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेतला जात असे. परंतु या सर्व प्रथा आणि परंपरेला छेद देत महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘वर्षा’वरच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे कामगार संघटनांची बैठक लावून त्यावर निर्णय घेतला. या बैठकीत महापालिकेसह बेस्ट उपक्रमाचे अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली २०२१ निमित्त २० हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल साडेचार हजारांची वाढ यंदाच्या सानुग्रह अनुदानात करून देत मुख्यमंत्र्यांनी जे बोलतो ते करून दाखवतो, असाच संदेश दिला आहे.
‘वर्षा’वर झाला निर्णय
मुंबई महापालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी/कर्मचारी यांना दीपावली – २०२१ सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे झालेल्या बैठकीत २० हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. बैठकीला उप महापौर ऍड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्यासह मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी / कर्मचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा : शिवसेना भवनासमोरच सेना-मनसेमध्ये कंदिल ‘वॉर’)
निवडणुकीच्या तोंडावर भरीव वाढ
मागील वर्षी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कामगार संघटनांनी १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला असल्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात महापौरांनी ५०० रुपयांची वाढ करून १५ हजार ५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे यंदा ५०० रुपयांची वाढ करून १६ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्याचा विचार होता, प्रशासनाने तसा प्रस्तावही तयार केला होता. परंतु शुक्रवारी झालेल्या बैठकीत मागील वर्षी पेक्षा साडेचार हजार रुपयांची भरीव वाढ देत मुख्यमंत्र्यांनी २० हजार रुपये एवढी दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील वर्षी कोविड काळात जे देता आले नाही ते आता शिवसेनेने आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून २० हजारांची भेट जाहीर करून टाकल्याचे दिसून येत आहे.
सानुग्रह अनुदानाबाबत घेतलेले निर्णय
- महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी/कर्मचारी, प्राथमिक शिक्षक : २० हजार रुपये
- माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळा यातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारी : १० हजार रुपये
- प्राथमिक शिक्षण सेवक : ५ हजार ६०० रुपये
- आरोग्य सेविका : ५ हजार ३०० रुपये
- विनाअनुदानित माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवक : २ हजार ८०० रुपये