Chief Minister : मुख्यमंत्र्यांचा ‘ओएसडी’ निघाला तोतया; प्रशासनात खळबळ

या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

28
Chief Minister : मुख्यमंत्र्यांचा 'ओएसडी' निघाला तोतया; प्रशासनात खळबळ
Chief Minister : मुख्यमंत्र्यांचा 'ओएसडी' निघाला तोतया; प्रशासनात खळबळ
मुंबई : तोतया अधिकारी बनून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वेळोवेळी चर्चेत येत असतात. परंतु, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांचाच ‘ओएसडी’ तोतया निघाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आठ महिन्यांपासून तो मुख्यमंत्री कार्यालय, वर्षा-नंदनवन बंगला, सह्याद्री अतिथीगृह आणि मुख्यमंत्र्यांच्या अन्य कार्यक्रमांतही वावरत होता.
मयूर ठाकरे असे या तोतया ‘ओएसडी’चे नाव असून, तो अमरावतीच्या अचलपूर नगरपालिकेतील तृतीयश्रेणी कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. बनावट नियुक्ती पत्र आणि मुख्यमंत्री सचिवालयाचे ओळखपत्र तयार करून तो गेल्या आठ महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात वावरत होता.

(हेही वाचा –Aaditya L1 : आदित्य एल-1 ने काढला सेल्फी आणि पृथ्वी अन् चंद्राचेही काढले फोटो)

शिंदे यांच्या मागची नेत्यांची वर्दळ आणि त्यांच्याकडच्या कामांचे स्वरूप हेरून त्याने मुख्यमंत्र्याचा ‘ओएसडी’ असल्याचा बनाव रचला. त्याचा फायदा होत असल्याचे लक्षात येताच त्याने अचलपूर नगरपालिकेतून थेट मंत्रालयात तेही मुख्यमंत्री सचिवालयात रूजू झाल्याचे भासवले. त्यासाठी खोटे नियुक्तीपत्र, त्याआधी प्रतिनियुक्तीचा आदेश तयार केला. तो दाखवून तो अचलपूर नगरपालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर ओळखपत्रही तयार करून घेतले. त्याआधारे त्याने मुख्यमंत्री कार्यालयातून फायली फिरवून कॅबिनेट मंत्री, सचिव, आयुक्तांकडून ‘रिमार्क’ घेत नेते, बिल्डर, ठेकेदारांच्या फायली मार्गी लावल्याचे समोर आले आहे.
अशी पकडली चोरी
मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिमहत्त्वाच्या बैठका सुरू होत्या. तेथे मयूरची धावपळ पाहून एका वरिष्ठ अधिकाऱ्याला संशय आल्याने त्याने त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, गडबडीत असल्याचा बहाणा करीत त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने त्याची झाडाझडती घेण्यात आली. त्यात त्याने सरकारी यंत्रणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.