मुख्यमंत्र्यांच्या वाहनासाठी यापुढे ट्रॅफिक अडवले जाणार नाही! कारण…

145

एकनाथ शिंदे यांची प्रतिमा सर्वसामान्यांचा नेता म्हणून आहे. मुख्यमंत्री बनल्यावरही त्यांनी त्यांची प्रतिमा कायम तसाच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा जेथून जाईल, त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल न देण्याचा निर्देश स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे यापुढे मुख्यमंत्र्यांची गाडी ज्या भागातून जाईल त्यावेळी वाहतूक थांबवायचे नाही, असा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सर्वसामान्यांतील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले जाते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या अवघ्या काही दिवसात शिंदेंनी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी शुक्रवारी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गिकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही, याची खबरदारी घ्या अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून अतिमहत्वाच्या व्यक्तींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका आहे.

(हेही वाचा ‘धनुष्यबाण शिवसेनेचेच, कुठेही जाणार नाही’ संजय राऊतांचे विधान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.