पाटण्यात जाऊन हिंदुत्व वेशीवर टांगले! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाकरे गटावर टीकास्त्र

241
पाटण्यात जाऊन हिंदुत्व वेशीवर टांगले! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाकरे गटावर टीकास्त्र
पाटण्यात जाऊन हिंदुत्व वेशीवर टांगले! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाकरे गटावर टीकास्त्र

मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही आणि झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवा, शुक्रवारी पाटणा येथे भाजप विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज ट्विट करत ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

(हेही वाचा – पहिल्याच पावसात शिवाजीपार्क मैदान तलावसदृश्य)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे. आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्यच दिसत होते. मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येत आहेत. हाच मोदींच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कालच्या बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या मांडीला मांडी लाऊन बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची आवई उठवून १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.