निष्ठेचे दाखले देत शिवसेना, मनसेकडून भाजप कार्यकर्त्यांना चिथवण्याचा प्रयत्न!

केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपने महाराष्ट्रातून ज्यांना संधी दिली, त्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी टीका केली नाही.

103

महाराष्ट्रातील चार खासदारांची केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी लागल्यानंतर राज्यातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेना, मनसेकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथवण्याचे काम सुरु झाले आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रितम मुंडे यांची वर्णी न लागल्याने तसेच नारायण राणे, पवार आणि कपिल पाटील हे पक्षांतर करून आल्यानंतरही पक्षाने त्यांची मंत्रीपदी वर्णी लावल्याने शिवसेना व मनसेकडून निष्ठावंताचे दाखले देत भाजपमध्ये निष्ठावंतांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या, असे सांगत कार्यकर्त्यांना चिथवण्याचे काम सुरु झाले आहे.

सोशल मीडियावर भाजप ठरले लक्ष्य!

माजी मुख्यमंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड या चार खासदारांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली. या चारही खासदारांची केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या पोटात गोळा उठला. नारायण राणे यांना केंद्रात मंत्री बनवल्याने शिवसेनेच्या पोटदुखीला सुरुवात झाली. परंतु नारायण राणे यांच्या विरोधात न बोलता शिवसेनेने खासदार प्रितम मुंडे यांच्या निष्ठेविषयीच्या पोस्ट फेसबूकवर टाकून बाहेरुन आलेल्यांना कशाप्रकारे मंत्रीपदे वाटतात, यावर भाष्य केले. त्यामुळे शिवसेनेच्या फेसबूकवरील सर्व ग्रुपवर प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न दिल्याबाबतच सर्वााधिक पोस्ट व्हायरल होत होत्या. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमध्ये ज्या निष्ठेने काम केले, त्यांच्या मुलांवरही भाजपचे लक्ष नाही, मंत्रीपदात त्यांना डावलले जात आहे, अशाप्रकारच्या पोस्ट करत भाजपमध्ये निष्ठावंतांना नव्हेतर बाहेरुन आलेल्यांना किंमत असल्याचे चित्र निर्माण करत एकप्रकारे भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथवण्याचे काम सोशल मीडियाद्वारे सुरु केले.

(हेही वाचा : पहिल्याच दिवशी राणेंनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा)

दोन्ही काँग्रेसपक्ष सेना-मनसेला अधिक दुःख!

तर मनसेही निष्ठावंतांनी सतरंज्याच उचलायच्या, असे सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचे काम केले आहे. डॉ. भारती पवार, कपिल पाटील आणि नारायण राणे यांनी इतर पक्षामधून भाजपमध्ये कधी प्रवेश केला, याचे दाखले देत कार्यकर्त्यांना ‘तुम्ही फक्त सतरंज्याच उचला’, अशाप्रकारच्या पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे राज्यातील चार खासदारांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर सर्वात जास्त दु:ख हे शिवसेना आणि मनसेलाच अधिक झाल्याचे दिसून येत आहे. याउलट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी नारायण राणे यांना शिवसेनेला शह देण्यासाठी म्हणून मंत्री बनवले असेल, तर हा घटनेचा अवमान असल्याचे सांगितले. नारायण राणे हे पूर्वी शिवसेनेचेच होते, तर भारती पवार आणि कपिल पाटील हेही आमच्याच राष्ट्रवादीचे होते. त्यामुळे भाजपला आमच्या पक्षामुळेच हे चेहरे मिळाल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, नारायण राणे यांना मंत्रीपद मिळाल्याने पोटात प्रचंड असंतोष खदखदत असल्याने राऊत यांनी ‘राणे यांचा कद मोठा आहे. ते माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा राजकारणातील अनुभव  मोठा आहे. त्यामुळे लघु व सुक्ष्म उद्योगमंत्रीपद त्यांना देवून एकप्रकारे राणे यांचा अवमान केला आहे’, असे सांगत भाजप विरोधात आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु जे शिवसेनेला आणि काँग्रेसला कळले नाही, ते राणेंमधील गुण भाजपला कळाले आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देशासाठी करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राऊतांची पोपटपंची आम्ही ऐकलीही नाही’, असे काही राणे समर्थक व भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राणे साहेबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय पक्षाध्यक्ष नड्डा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरुन आपल्या पदाला न्याय देतील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील लघुउद्योगाला चालना देतील, असा विश्वासही भाजपच्या नेत्यांनी वर्तवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.