अभियंत्यांच्या मागणीवर पुन्हा आयुक्तांचे दुर्लक्ष; मुख्यमंत्र्यांना दिलेल्या शब्दांचा पडला विसर

108
मुंबई महानगरपालिका इंजिनीअर्स असोसिएशनच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना तत्काळ  निर्णय घेण्याचे आदेश दिल्यानंतरही अद्याप यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. तब्बल २० दिवसांपेक्षा अधिक दिवस उलटून गेल्यानंतरही कोणत्याही प्रकारची बैठक आयुक्तांनी घेतलेली नसून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या आयुक्तांना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने, मुंबई महानगरपालिका इंजिनीअर्स असोसिएशनच्या  पुढाकाराने  गुरुवारी १५ सप्टेंबर रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष  व  खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अभियंत्यांच्या मागणीचे  निवेदन दिले होते.
( हेही वाचा: नारायण राणेंनी आरोप केलेला ‘तो’ चतुर्वेदी गेला कुठे? )

या कार्यक्रमात खासदार शेवाळे आणि कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी महापालिका अभियंत्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्याची विनंती केली होती. त्यात पालिका अभियंत्यांची वेतनश्रेणी राज्य सरकारच्या अभियंता पदानुसार करावी, डॉक्टरांप्रमाणे कायदा करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, सहाय्यक आयुक्त पदाकरता अभियंत्यांना पन्नास टक्के आरक्षण द्यावे, पदोन्नतीच्या जाचक अर्हता रद्द कराव्यात यांसह अन्य मागण्यांचा समावेश होता. या सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले होते.
मुंबई महानगरपालिका अभियंत्यांच्या वेतनश्रेणी आणि पदोन्नती बाबतच्या प्रलंबित मागण्या लवकरच पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता पण आज २० दिवस उलटून गेले तरी अभियंत्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आजपावेतो अभियंत्यांच्या संघटनांची बैठक आयुक्तांनी तसेच अतिरिक्त आयुक्तांनी बोलावून त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे आयुक्तांनी, मुख्यमंत्र्यांसमोर सकारात्मकता दर्शवली असली तरी त्यांची पाठ फिरल्यावर अभियंत्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही. त्यामुळे आयुक्त चहल यांना याचे विस्मरण झाले की पुन्हा एकदा अभियंत्यांच्या मागणीवर डोळेझाक केली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.