मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कोणाच्याही बापात हिंमत नाही – फडणवीस

80

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी हे सरकार अस्तित्त्वात आल्याची टीका आता सुरू होईल. पण, मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कोणाच्याही बापात हिंमत नाही. मुंबई, मराठीपण आणि महाराष्ट्रीय संस्कृतिचा आम्हाला अभिमान आहे. भाजप-शिवसेना युती सरकार मराठी माणसाच्या हक्कांसाठी कोणतीही लढाई लढण्यास समर्थ आहे, असे ठाम मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी शनिवारी व्यक्त केले.

( हेही वाचा : एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार; उद्धवसेनेकडून ‘हिंदुत्वा’चा मुद्दाही हायजॅक करण्याची तयारी? )

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपसत्रात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत. सगळ्यांना समान न्याय देण्याची आमच्या हिंदुत्त्वाची भूमिका आहे. त्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आमच्यासोबत आहे. आम्ही अडीच वर्षे पूर्ण करूच, पण पुढच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने निवडून येऊ. ९ वाजता बोलणारे अलिकडे कमी बोलू लागले आहेत. तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका. हे सरकार येण्यात त्यांचा सर्वाधिक वाटा आहे. महाराष्ट्राच्या जनतेला, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी वैताग आणला. हे सरकार मोदींचे सैनिक आणि बाळासाहेबांच्या सैनिकांचे आहे. ते महाराष्ट्राला नव्या शिखरावर नेऊन ठेवतील.

ओबीसी आरक्षणासाठी गेल्या अडीच वर्षांत मविआ सरकारने काहीच केले नाही. दीड वर्षे केंद्रांच्या नावाने ओरड केली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जबाबदारीचे भान आणून दिले. ज्या गोष्टी २० दिवसांत आम्ही केल्या, त्या ते अडीच वर्षांत करू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे इच्छाशक्ती नव्हती. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही निर्णय घेतले. पण गेल्या सरकारने त्यावर काहीच केले नसल्याने न्यायालयात आपण मागे पडलो आहोत. आता ही लढाई पुन्हा नव्याने लढावी लागणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

प्रत्येकाला पद मिळेलच असे नाही, अपेक्षांना आवर घाला

सरकार आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याच्या अपेक्षा वाढत जातात. आपल्याही वाढल्या आहेत. पुढच्या अडीच वर्षांत त्यातील थोड्याफार पूर्ण होतील. युतीचे सरकार असल्याने शिवसेनेला सोबत घेऊन चालायचे आहे. त्यामुळे कमीत कमी अपेक्षा ठेवा आणि पुढील निवडणुकीत भव्य यश मिळवण्यासाठी तयारीला लागा. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अनेकजण इच्छुक आहेत. पण, काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील. निकषांत बसतील अशा नावांची निवड करावी लागेल. त्यामुळे यावेळी नाराजी नव्हे, तर एकजूट महत्त्वाची आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

पक्ष विचारावर चालतो, सत्तेवर नाही

आपण घराणेशाहीवर पक्ष चालवत नाही. त्यामुळे त्यावर कुणा एकाचा अधिकार नाही. पक्ष विचारावर चालतो, सत्तेच्या आधारावर नाही. त्यामुळे प्रत्येकाला मेहनतीच्या आधारावर पुढे यायचे आहे. इतरांसारखे आपणही वागत राहिलो, तर भाजपचाही ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. आपल्याला पक्षाची परंपरा पुढे घेऊन जायची आहे. अतिशय प्रमाणिक, लोकाभिमूख सरकार देण्याचा आपण प्रयत्न करुयात. हे बंदिस्त नव्हे, खुले सरकार आहे. कोणीही भेटू शकतो, आपले म्हणणे मांडू शकतो. आपल्याकडे अनुभवी नेते आहेत. पण सगळ्यांचा विचार करावा, इतक्या जागा नाहीत. त्यामुळे नाराज होऊ नका. आपल्याला मोदींच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवायचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.