आता राज्यात तलवारींचा खच सापडला आहे , गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होणार का?

48

महाराष्ट्रातील धुळ्यात तलवारींचा खच सापडला त्यावर भाष्य करताना, भाजपचे नेते आशिष शेलार यांनी थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. एका तलवारीवर कंबोज आणि राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. धुळ्यात तर खच सापडला आहे, त्यामुळे आता गृहमंत्र्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. मुंबईमध्ये  एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

त्यावर आता काय कारवाई करणार? 

कंबोज यांनी एक तलवार दाखवली, ती सुद्धा खोटी होती. तलवार दाखवण्यावरुन राज ठाकरेंवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारींचा खच सापडला. त्यावर आता काय कारवाई करणार?  हा खच जमा होईपर्यंत ज्या प्रशासकीय यंत्रणांना मागोवा लागलाच नाही, त्या पोलीस यंत्रणा चालवणा-या सरकारमधील गृहमंत्र्यांवर आता गुन्हा दाखल केला जाणार का? असा सवाल करत आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर  टीकेची झोड उठवली.

यामागे काॅंग्रेसचा हात

राम कदम यांनी आरोप केला होता की, या तलवारी राजस्थानमधून मागवल्या जात आहेत आणि यामागे काॅंग्रेसचा हात असून, महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचे षड्यंत्र सुरु आहे. यावर विचारले असता,आशिष शेलार यांनी म्हटले की, यावर राम कदम स्पष्टीकरण देतीलच. पण आज जे चित्र महाराष्ट्रात आहे त्यावरुन तरी असेच दिसून येत आहे.

म्हणून दंगली घडवण्याच्या योजना आखल्या जाताहेत

महाराष्ट्रातील सरकार सर्व मुद्द्यांवर विफल झाले आहे. विजेचे भारनियमन, पाणी मिळत नाही म्हणून कात्रजला पाणी मागणा-यांवर लाठीचार्ज , मंत्र्यांची तसेच देवदेवतांची नावे घेऊन केलेली शिवीगाळ,  काही मंत्र्यांवर रस्ते किंवा अन्य कामांत दाखल झालेले गुन्हे, मुख्यमंत्री मंत्रालयात नाहीत, मंत्री जनतेला भेटत नाहीत. शेतक-यांच्या प्रश्नांवर पीक विम्यावर उत्तर सापडत नाही. अशा विफल अवस्थेतून जनतेचे, महाराष्ट्राचे ध्यान भरकटवण्यासाठी या दंगली तर रचल्या जात नाहीत ना, योजना केल्या जात नाहीत ना? याची दाट शक्यता टाळता येत नाही. असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

राजकीय विवस्त्र केलंय

युसूफ लकडावाला वरुन सध्या जो वादंग सुरु आहे, त्यावरुनही आशिष शेलार यांनी आपले मत स्पष्ट केले. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत, शरद पवार यांचा लकडावालासोबतचा एक फोटो ट्वीट केला. त्यावर प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले की, फोटो टाकून कंबोज यांनी लकडावालांवर बोलणा-यांना राजकीय विवस्त्र केलं आहे.

( हेही वाचा: समृद्धी महामार्गावर निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचा आरोप, निर्माणाधीन पुल कोसळला! )

राऊतांचा घेतला समाचार

संजय राऊतांनी बुधवारी अनेक ट्विट केले त्यातील काही ट्वीट डिलीट केले. त्यावर बोलताना, आशिष शेलार म्हणाले की, ज्यावेळी माणूस स्वत:च्या अभ्यासावर स्वत:च्या बुद्धीवर काम करत नसतो, पेड अॅडवाईजवर किंवा पेड मदतनीसाच्या जीवावर राजकीय वक्तव्य करण्याचे काम करतो. त्याचवेळी त्या नेत्याला एक पाऊल आगे एक पाऊल पीछे अशी कदमताल करावी लागते आणि जागच्या जागेवरच मी पुढे चाललो आहे, असा भास निर्माण करावा लागतो. या आभासी जगताचे डिलीट हे आता संजय राऊत झाले असल्याचेही शेलार यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.