Rajasthan Legislative Assembly : अशोक गहलोत यांच्या विरोधात वसुंधरा राजे?

84
Rajasthan Legislative Assembly : अशोक गहलोत यांच्या विरोधात वसुंधरा राजे?
Rajasthan Legislative Assembly : अशोक गहलोत यांच्या विरोधात वसुंधरा राजे?
  • वंदना बर्वे

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत निवडणुकीनंतर विधानसभेचे तोंड बघू शकतील काय? असा प्रश्न काँग्रेसच्या वर्तुळात विचारला जातो आहे. याचे कारण असे की, भाजपने गहलोत यांना हरविण्यासाठी खास योजना तयार केली आहे. यामुळे केवळ काँग्रेसच नव्हे तर दस्तुरखुद्द गहलोत चिंतातूर झाले आहेत. ‘हिंदुस्थान पोस्ट’ला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, भारताच्या राजकारणाची नस-नस ओळखणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना हरविण्यासाठी ‘चक्रव्यूह’ रचण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, काँग्रेस मुख्यालयात खळबळ माजली आहे. गहलोत स्वत:चाच प्रचार करण्यासाठी आपल्या मतदारसंघात गुंतून पडले तर काँग्रेसच्या अन्य उमेदवारांचे कसे होईल? असा प्रश्न काँग्रेसला पडला आहे. (Rajasthan Legislative Assembly)

अशोक गहलोत सरदारपुरा या मतदारसंघातून सलग मागील कितीतरी वर्षांपासून निवडून येत आहेत. परंतु, विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या निकालानंतर गहलोत यांना विधानसभेचे तोंड पाहता येणार नाही, अशी भाजपची योजना आहे. मुळात, भाजप गहलोत यांच्या विरोधात राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मैदानात उतरविण्याचा विचार करीत आहे. याबाबत भाजप मुख्यालात गंभीर चर्चा सुरू आहे आणि याबाबत राजे यांना सुध्दा विचारणा करण्यात आली आहे. याशिवाय, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे नाव सुध्दा चर्चेत आहे. अशात, वसुंधरा राजे किंवा गजेंद्रसिंग शेखावत यांच्यापैकी कुणी एकानेही गहलोत यांच्या विरोधात दंड थोपटल्यास काँग्रेसच्या विजयाला लगाम लागू शकते. (Rajasthan Legislative Assembly)

(हेही वाचा – Western Railway : लोकल ट्रेन रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत)

‘आपण गहलोत यांच्या विरोधात निवडणूक लढणार काय?’, अशी विचारणा भाजपने वसुंधरा राजे यांच्याकडे केली आहे. राजे यांनी अद्याप उत्तर दिले नसल्याचे समजते. हाच प्रश्न शेखावत यांनाही विचारण्यात आला आहे. मात्र, दोन्ही नेत्यांनी लढण्यास होकार दिला तर भाजप वसुंधरा राजे यांना प्राधान्य देतील, अशी चर्चा आहे. महत्वाचा मुद्दा असा की, शेखावत यांनी गेहलोत यांच्या विरोधात निवडणूक लढविली तर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून बघितले जाऊ लागेल. गेल्या लोकसभा निवडणुकीत शेखावत यांनी जोधपूरमधून गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांचा पराभव केला होता. भाजपची केवळ गहलोतच नव्हे तर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात मोठ्या नेत्यांना उतरविण्याची योजना आहे. यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची यादी सुध्दा तयार करण्यात आली आहे. भाजपने रामसमंदच्या खासदार दिया कुमारी यांना सीपी जोशी यांच्या नाथद्वारा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कायदामंत्री मेघवाल यांच्यासह अर्धा डझन खासदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. दोन दिवस चाललेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राज्यातील ६५ जागांवर मंथन झाले. त्यापैकी ३९ जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामुळे, भाजपची राजस्थानमधील उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. (Rajasthan Legislative Assembly)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.