-
प्रतिनिधी
BJP महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, भारतीय जनता पक्षाने शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली आहे. “महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना उबाठाला मृत्यूशय्येवर नेऊन ठेवले असून, संजय राऊत यांनी इतर पक्षांची उठाठेव करण्यापेक्षा आपला पक्ष कसा सुधारेल याची चिंता करावी,” असा जळजळीत प्रहार भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (BJP)
संजय राऊत यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना नवनाथ बन यांनी एक मोठी भविष्यवाणी केली. “संजय राऊत यांना पुढच्या वेळी राज्यसभेची खासदारकी मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे खासदारकीसाठी ते सध्या राहुल गांधींच्या संपर्कात आहेत, ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे. राऊतांचा एक पाय काँग्रेसमध्ये गेला असून दुसराही लवकरच जाईल, त्यामुळे त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत,” असे बन यांनी सुनावले. तसेच, ज्या काँग्रेसच्या वळचणीला राऊत जाऊन बसले आहेत, त्याच काँग्रेसने महाराष्ट्रातील राजकीय परंपरा पायदळी तुडवून स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती, याची आठवणही त्यांनी करून दिली. (BJP)
(हेही वाचा – Nitish Kumar यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून घेतली शपथ!)
चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरून टोला लगावताना बन म्हणाले की, “ऑपरेशन हे नेहमी जिवंत माणसाचे होते, मृतदेहाचे नाही. तुमच्या पक्षाकडे आमदार, नगरसेवक किती उरलेत याचा आधी विचार करा.” भाजपामध्ये अंतर्गत संघर्ष असल्याच्या दाव्याचाही त्यांनी समाचार घेतला. “भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ आहे, मात्र शिवसेना उबाठात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत असे तीन गट पडले असून राऊत-आदित्य यांच्यातील सुंदोपसुंदी महाराष्ट्राने पाहिली आहे,” असा दावा त्यांनी केला. (BJP)
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी भाजपाच्या आमदारांना ‘फुटकी कवडी’ही दिली नव्हती, असा आरोप करत बन यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “मुंबई महापालिकेत २५ वर्षे सत्ता असताना त्यांनी विरोधकांना निधी नाकारण्याचे धोरण अवलंबले, म्हणूनच जनतेने त्यांना घरी बसवले. याउलट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वृत्ती सर्वसमावेशक असून आता महापालिकेच्या सर्व गटनेत्यांना, अगदी शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनाही समान निधी दिला जात आहे,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या दातृत्वाचे कौतुक केले. या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुरा अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

