-
प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणात हिंदी भाषा अनिवार्य करण्यास विरोध दर्शविल्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आधी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करावा. त्यासाठी आम्ही त्यांना धोरणाची प्रत पाठवू. पूर्ण अभ्यासानंतरच याबाबत बोलावे,” असे शेलार यांनी सुनावले. तसेच, शिवसेना उबाठाकडून मुंबईतील पाणीप्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनांवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. “मुंबईकरांना पाणीसंकटात टाकण्याचे पाप आदित्य ठाकरे यांचेच आहे,” असे शेलार म्हणाले.
(हेही वाचा – ISSF Shooting World Cup : ऑलिम्पिक चॅम्पियन मनू भाकरला हरवून सुरूची सिंगला दुहेरी सुवर्ण)
शेलार (Ashish Shelar) यांनी मराठी भाषेच्या सन्मानावरही भर दिला. “मुंबईत मराठीला मान-सन्मान मिळालाच पाहिजे. मराठीला तुच्छ लेखण्याचे पाप कोणी करू नये. राज्य सरकार मराठीच्या सन्मानाची काळजी घेत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना शेलार म्हणाले, “आदित्य ठाकरे आणि शिवसेना उबाठाने गारगाई-पिंजाळ प्रकल्पांना स्थगिती दिली, ज्यामुळे मुंबईला वाढीव पाणीपुरवठा मिळाला नाही. वॉटर लिकेजसाठी २५० कोटींचे टेंडर काढूनही त्यांनी पाण्याचा अपव्यय रोखला नाही. पर्यावरणमंत्री असताना समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, त्याचे काय झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
(हेही वाचा – Cyber Security : वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी नागरिकांच्या सेवेत येणार २४ तास ‘डिजिटल रक्षक’)
याशिवाय, संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल २०२५ रोजी गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे विशेष सांगीतिक मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमक आदी कलाकार सहभागी होणार असून, सुबोध भावे संचालन करणार असल्याची माहिती शेलार (Ashish Shelar) यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community