अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : प्रचार सोशल मीडियावरही दिसेना

81

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील प्रचाराला सुरुवात झाली असली निवडणुकीपूर्वी गाजावाजा झालेल्या या निवडणुकीच्या प्रचाराची चर्चा विभागात किंवा सोशल मीडियावरही ऐकायला किंवा पाहायला मिळत नाही. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या एकमेव प्रमुख पक्षाच्या उमेदवार असून इतर नोंदणीकृत व अपक्षांसहित एकूण सात उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र या निवडणुकीचा प्रचार अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

३ नोव्हेंबर रोजी ही पोटनिवडणूक होणार

अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासहित दोन नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार आणि चार अपक्ष उमेदवार यांसह एकूण ०७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात येत्या ३ नोव्हेंबर रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे. मात्र ही निवडणूक जेवढी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, उमेदवारी अर्ज भरेपर्यंत चर्चेत होती, तेवढी त्यांच्या प्रचाराची चर्चा कुठेही ऐकायला मिळत नाही. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुलजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीची चुरसच संपली. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होत असून ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चितच मानला जात आहे. मात्र पटेल रिंगणात नसल्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचारात तेवढे प्रभावशील दिसून येत नाही. या मतदारसंघात ऋतुजा लटके यांचा घरोघरी फिरून प्रचार सुरू असला, तरी या प्रचाराला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळेच ना प्रचाराची चर्चा विभागातच ऐकायला मिळते ना सोशल मीडियावर.

(हेही वाचा नुसता जंगली नव्हे, तर शहरी नक्षलवादाचाही बिमोड करा! पंतप्रधान मोदींचे आवाहन)

उमेदवारांकडून प्रचार नाहीच

एरव्ही उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या शक्ती प्रदर्शनाचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणारे त्यांचे कट्टर समर्थकही या प्रचाराचे फोटो व्हायरल करत नाही की कोणत्या पोस्ट. एका बाजूला ९० टक्के लढाई जिंकल्याने सेनेच्या उमेदवाराला प्रचार करण्याची गरजच वाटत नाही आणि त्यातच दिवाळी आल्याने कार्यकर्त्यांनाही प्रचारात फिरण्यास वेळ नसल्याने उमेदवारानेही प्रचारात फिरण्याचे टाळले. दिवाळी, लक्ष्मी पूजन, सूर्यग्रहण, भाऊबीज आदी दिवशी प्रचार बऱयाच अंशी थंडावल्याचे पाहायला मिळाला होता. त्यामुळे विभागातील जनतेलाही दिवाळीत या निवडणुकीचा विसर पडल्याचे पाहायला मिळत आहे.

अपक्ष उमेदवारही थंडावले

ही निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून मशाल या चिन्हावर ते प्रथमच ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सर्वाधिक जास्त मते लटके यांच्या पारड्यात पाडून घेऊन त्याचा फायदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला करून घेण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र दुसरीकडे नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष हेही प्रचारात अधिक बाजी मारताना दिसत नाहीत. अपक्ष वेगळ्या प्रकारे प्रचार करत असले तरीही ते जास्त मत घेऊ शकणार नाही, असे स्थानिकांना वाटत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अपक्ष आमदार मिलिंद कांबळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याचा आरोप केला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी एका बाजूला होत असली तरीही या तक्रारीकडे तेवढेसे लक्ष दिलं नाही असं दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.