अमरावतीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार, हल्लेखोर पसार

95

शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना स्थानिक मुलताई चौकात शनिवारी रात्री ९.३५ वाजताच्या सुमारास घडली. गोळीबारात घारड हे गंभीर जखमी झाले असून, शरीरात खोलवर गोळी घुसल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेमुळे वरुड तालुक्यात खळबळ माजली आहे. तर शहरात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

पुढील उपचारार्थ नागपूरला हलवण्यात आले

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड हे शनिवारी रात्री मुलताई चौकात उभे असताना त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. यात त्यांच्या कमरेला एक गोळी लागली असून दुसरी गोळी त्यांच्या बाजूने गेली. यात गंभीर दुखापत झाल्यानंतरही योगेश घारड यांनी दुचाकीने हल्लेखोरांचा पाठलाग केला. परंतु रक्तस्त्राव अधिक होत असल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती वरूड शहरासह तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली व येथील ग्रामीण रूग्णालयात लोकांनी गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वरूडसह बेनोडा, शेंदूरजनाघाट, मोर्शी, शिरखेड पोलिसांचा ताफा वरूड ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला होता. त्यामुळे येथील ग्रामीण रूग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान घारड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलवण्यात आले. हल्लेखोरांनी घारड यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी कमरेजवळ लागली.

( हेही वाचा: एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावावी, भाजपची मागणी )

तपास सुरु

हल्लेखोर तोंडाला दुपट्टा बांधून आले होते. ते एका काळ्या पल्सर दुचाकीने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पांडे हे वरूडात दाखल झाले आहेत. पोलिसांनी लगेच हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. तसेच मुलताई परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणे सुरू करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.