Manipur : मणिपूरमध्ये म्यानमारमधून ७१८ नागरिकांची घुसखोरी; हुसकावून लावण्याचे आसाम रायफल्सला आदेश 

104

मणिपूरमध्ये म्यानमारमधील ७१८ नागरिकांच्या घुसखोरीचे प्रकरण समोर आले आहे. राज्य सरकारने 24 जुलै 2023 रोजी आसाम रायफल्सला या घुसखोरांना भारतातून तत्काळ हद्दपार करण्याचे निर्देश दिले आहेत. 22 आणि 23 जुलै रोजी हे लोक बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत घुसले होते. त्यापैकी 301 बालके असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील या घुसखोरीवर राज्य सरकारने चिंता व्यक्त केली आहे.

मणिपूरचे भाजप आमदार राजकुमार इमो सिंह यांनी ट्विट केले आहे की, हे लोक वैध कागदपत्रांशिवाय राज्यात कसे घुसले हे शोधण्यासाठी सरकारने या संदर्भात अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती मागवली आहे. त्यांनी सांगितले की, बेकायदेशीरपणे घुसलेल्या म्यानमारमधील नागरिकांना तातडीने परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मणिपूर हे सर्व समुदायांच्या मूळ रहिवाशांसाठी आहे घुसखोरांसाठी नाही.

(हेही वाचा PFI आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही ‘इंडिया’; पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केला हल्लाबोल)

मणिपूरच्या गृह मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की, आसाम रायफल्सच्या मुख्यालयाला म्यानमारच्या 718 नागरिकांच्या घुसखोरीचे वृत्त मिळाले होते. हे लोक चंदेल जिल्ह्यातील न्यू लजांग येथून मणिपूरमध्ये दाखल झाले. 718 घुसखोरांमध्ये 209 पुरुष, 208 महिला आणि 301 लहान मुलांचा समावेश आहे. हे लोक लैजांग, बोन्से, न्यू सोमाताल, न्यू लायजांग, यांगनोम्फई, यांगनोम्फई सॉ मिल आणि अल्वोमजांग येथे राहतात.

मणिपूरमध्ये म्यानमारच्या नागरिकांची घुसखोरी रोखण्यासाठी भारत सरकारच्या सूचनेनुसार कठोर कारवाई करावी, असे आसाम रायफल्सला स्पष्ट शब्दांत कळवण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. घुसखोरीचा हा प्रकार सध्याच्या परिस्थितीत अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगून राज्य सरकारने आसाम रायफल्सकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. म्यानमारच्या नागरिकांना चंदेल जिल्ह्यात का आणि कसे प्रवेश देण्यात आले? तसेच या लोकांना तातडीने त्यांच्या देशात परत पाठवण्यास सांगितले. उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक, चंदेल यांना आसाम रायफल्सला दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचे आणि सर्व घुसखोरांचे फोटो आणि बायोमेट्रिक तपशील ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.