१३००० फुटांवरचा स्वर्ग !

158

ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण काश्मीरमध्ये अतिशय दुर्गम ठिकाणी पहिल्या सोलर ग्रीडचा प्रकल्प नुकताच यशस्वी झाला. आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता पण तो आनंद एक वेगळी वाट मोकळी करून देणारा होता हे आता उशिरा कळले.

अतिशय उंच -जिथे बर्फ १०-१० फूट साठलेला असतो- जिथे परकीय सैन्याने अनेकदा कुरघोडी केलेल्या आहेत. जिथे वीज पडणे नित्याचे, इतके की आम्ही काम करत असतांना देखील अशी एक घटना घडली अशा ठिकाणी “देशसेवा हाच धर्म” हे ज्यांचे ब्रीदवाक्य अशा आपल्या सैन्याची सेवा करण्याचा योग आला. अतिशय कठीण परिस्थितीत अगदी आनंदाने सर्व संकटांना हसत सामोरे जाणारे हे सैनिक जेव्हा भेटले तेव्हा अगदी एकमताने आम्ही ठरवले की याची बातमी करायची नाही. ते जे कर्तव्य बजावतात त्या प्रती आपले हे कर्तव्य आणि म्हणून आज उद्घाटनानंतर ६ महिन्यांनी ही कामगिरी अगदी उत्तम रित्या यशस्वी झाल्यानंतर आपल्याला हा अनुभव सांगताना मनात वेगळीच भावना निर्माण झाली आहे.

New Project 3 14

ठिकाणाचे नाव मी सांगणार नाही… सांगू शकत नाही पण कुपवारा भागातील अगदी दुर्गम अशी ही पोस्ट. शत्रूवर दादागिरी सहज करू शकणारी पण त्याचवेळी निसर्ग आणि शत्रूला सहज हादरवून सोडणारी, इथे वीज अत्यल्प किंवा नाहीच त्यामुळे जे काही ते डिझेलच्या जनरेटर वर – ऐन थंडीत एखादा जनरेटर खराब झाला तर मग केरोसीन वर .. अर्थात अशा सर्वच गोष्टींचा विचार करूनच नियोजन असते पण शेवटी मर्फीज लॉ .. अशावेळी याला पर्यायी कमी खर्चिक पण स्थायी असा काय उपाय असू शकेल असा विचार झाला आणि आम्हाला तिथे “सोलर ग्रीड” बसवायची परवानगी मिळाली – सगळ्यांसाठी हा कसोटीचा क्षण कारण जर हे आज यशस्वी झाले तर नंतर अनेक अशा पोस्ट वर हा पर्याय उपलब्ध करता येणे शक्य आहे आणि होईलच. खर्च सर्व आम्ही करणार असे म्हणल्यावर तेथील अधिकारी म्हणाला “नको आपण करूया एकत्र” , पण मग या सैनिकांची सेवा करण्यास आम्ही कमी पडलो असतो म्हणून आम्ही हट्टच केला.

अनेकांना शंका होती की बर्फ – उंची – वीज यांना हा पर्याय तोंड देऊ शकेल ? ही तरुण मुले तिथे काम करू शकतील का ? अशी काळजी होती – त्यात २ महिला कर्मचारी तिथे काम करत होत्या. आज या वर्षीचा चिल्हाई कलन झाल्यावरचे उत्तर आहे “हो” नक्की देऊ शकेल आणि हाच आनंद तुमच्या पर्यंत पोहचवत आहे.

मी या भागाला स्वर्ग यासाठी मानतो, कारण तिथे काम करणारा प्रत्येक सैनिक मला देवाचे रूप वाटतो – “स्व” ला विसरून – “राष्ट्र” प्रती सर्वस्व समर्पित करण्यास तयार असे अनेक जण तिथे मला भेटले आणि आम्ही सहज त्यांच्या समोर नतमस्तक झालो.

New Project 2 14

असीमच्या आजवरच्या कालावधीत आम्ही अनेक वेगळे हटके प्रयोग केले पण सैन्य रुपी देवतेची आराधना सहज करता येण्यासारखा हा पर्याय सर्वाधिक समाधानकारक होता यात शंका नाही.

सारंग गोसावी

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.