मुंबईकरांसाठी रविवारचा दिवस थंडीचा!

204

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. सकाळी कोवळ्या उन्हात थंडी वाढलेली असताना रात्रीही थंडीचे वारे वाहत असल्याचा अनुभव मुंबईकरांना येत आहे. मुंबईत किमान तापमान सध्या १९ तर कमाल २९ अंश सेल्सिअसवर नोंदवले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत थंडीच्या वा-यांचा प्रभाव दिवसभर जाणवत आहे. या प्रभावामुळे रविवारी तापमानाची डुबकी अजून खाली जाईल. रविवारचा वीकेण्ड मुंबईकरांना १८ अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाचा अनुभव देणार आहे. त्यामुळे रविवारची सकाळ मुंबईकरांच्या थंडीत थोडी अजून भर टाकेल.

तापमानात घट कायम राहिल्यास…

सकाळी प्रभातफेरीसाठी बाहेर पडलेल्यांना मुंबईतील थंडी चांगलीच सुखावू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला पावसाच्या मा-यामुळे थंडीचे आगमन झाले होते. दरम्यानच्या काळात किमान तापमानात पुन्हा वाढ झाली. किमान तापमान २४ अंशापर्यंत पोहोचल्याने थंडी पुन्हा गायब झाली की काय, अशी भावना मुंबईकरांमध्ये निर्माण झाली. डिसेंबरची महिना अखेर जसजशी जवळ येतेय, तसतसा गारठा पुन्हा सुरु झाला आहे. त्यामुळे सकाळी लोकलप्रवास करणारे चाकरमनी शाल आणि मफलर घेऊन बाहेर पडत आहेत. दुपारी कोवळया उन्हाचा अनुभव येत असला तरीही सायंकाळी पुन्हा थंडीचे वारे वाहत असताना परतीचा प्रवासही चाकरमान्यांसाठी सुखावह ठरत आहे. तापमानात घट कायम राहिल्यास सोमवारपर्यंत कमाल तापमानही २८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण! )

हवेचा दर्जा झाला खराब

शुक्रवारी मुंबईत सायंकाळपर्यंत धुरके दिसून आले. थंडीच्या दिवसांत हवेतील धूलिकणांना इतरत्र फिरायला मिळत नाही. परिणामी धूलिकण एकाच ठिकाणी साचून राहिल्याने हवेचा दर्जा खराब होतो. शुक्रवारी मुंबईतील हवेचा दर्जा २६२ पर्यंत नोंदवला गेला.

पुढील दोन दिवसांसाठी तापमानाचा अंदाज

  • १९ डिसेंबर – कमाल तापमान २९ तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवर राहील
  • २० डिसेंबर – कमाल तापमान २८ तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवर राहील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.