मराठीचा गोडवा व परदेशी तडका! महाराष्ट्रातील ‘पोर्तुगीज’ भाषिक गावाची अनोखी कहाणी

138

आपण म्हणतो जेवण- बिवण ते म्हणतात कुमे- बिमे, आपल्यासारखीच ‘च’, ‘त’ अशा व्यंजनांवर जोर देऊन बोलण्याची पद्धत, त्यांच्या व्यवसायांना सुद्धा पाटील, गवळी ही मराठी नावं, हे सगळं काही अगदी मराठमोळचं फक्त त्याला इथे दिला जातो परदेशी तडका. ही कहाणी आहे रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या संगमावर वसलेल्या टुमदार गावाची, कोर्लईची! या गावात मराठी व पोर्तुगीज भाषेचा अनोखा मेळ पाहायला मिळतो. सुमारे चार शतकांपूर्वी व्यवसायासाठी आलेल्या पोर्तुगीझांनी त्यावेळी या गावी आपला चांगलाच जम बसवला होता. हळूहळू येथील भाषा, खाद्यसंस्कृती व एकूणच जीवनशैलीवर पोर्तुगिझांचा प्रभाव दिसू लागला आणि यातूनच उदयाला आली कोर्लई क्रेओल पोर्तुगीज उर्फ नॉलिंग भाषा, म्हणजेच आमची भाषा!

1520-1740 या तब्बल सव्वा दोनशे वर्षांच्या कालावधीत कोकण प्रांतात पोर्तुगीजांचे वर्चस्व होते, यातीलच एक महत्वाचे ठिकाण म्हणजे चौलबंदर व नजीकचं कोर्लई गाव. पुढे चिमाजी अप्पा यांनी कर्तबगारीने हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हातून सोडवला मात्र काही पोर्तुगीज सैनिक यावेळी खाडीतून पोहून कोर्लई मध्ये आले आणि तिथेच स्थित झाले. वेगस, रोझारिया अशी अवघी चार- पाच कुटुंब या गावात आली व मग पुढे तिथलीच झाली. ही मंडळी सुरवातीला लॅटिन कालांतराने पोर्तुगीज व नंतर स्थानिक मराठी व पोर्तुगीज असा मेळ साधणारी भाषा बोलू लागली. सोयीने निर्माण झालेली नॉलिंग भाषा आजही कोर्लई गावात संवादासाठी वापरली जाते. मुख्यतः शेतात लावणी करताना, गवत काढताना, लग्नप्रसंगी विशेषतः हळदीच्या दिवशी कोर्लईकर आपल्या नॉलिंग भाषेतील गाणी आवर्जून गातात.

नॉलिंगला मराठीचा आधार!

कोर्लई गावातील तब्बल १००० रहिवाशांकडून वापरलेली जाणारी नॉलिंग भाषा ही काळाच्या ओघात बरीच मागे सरत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे नॉलिंग ही केवळ बोली भाषा असून पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी या भाषेची लिपी उपलब्ध नाही. गावची वेस ओलांडताच इतरांशी संवाद साधण्यासाठी कोर्लईकरांना मराठीचाच आधार घ्यावा लागतो. परिणामी आज कोर्लईतील व्यवहाराची, सरकारी कामकाजाची अधिकृत भाषा ही मराठीच आहे, इतकंच नव्हे येथील चर्च मध्ये बायबल सुद्धा मराठी भाषेतच शिकवले जाते. यामुळे सध्या नॉलिंग भाषेतील विविध शब्दांवर मुख्यतः मराठीचा प्रभाव दिसून येतो.

मालवणी, कोकणी या अन्य बोलीभाषांप्रमाणे कोर्लई क्रेओल पोर्तुगीज उर्फ नॉलिंगला सुद्धा भाषा म्हणून मान व ओळख मिळावी असा कोर्लईकरांचा प्रयत्न आहे. जर आपणही भाषाप्रेमी असाल तर मराठीचा गोडवा जपून, पोर्तुगीज इतिहास गाठीशी धरून तयार झालेली ही भाषा ऐकण्यासाठी कोर्लईला एकदा आवर्जून भेट द्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.