-
ऋजुता लुकतुके
इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज अर्थात आयटीआयसाठी मागचा महिनाभराचा कालावधी उत्कंठावर्धक गेला आहे. ही कंपनी बीएसएनएल व एमटीएनएल सारख्या सरकारी कंपन्यांना पायाभूत सुविधा पुरवते. डिजिटल मोबाईल रेडिओ यंत्रणा, स्मार्ट एनर्जी मीटर, ऑटोमेशनसाठी आवश्यक उपकरणं अशी इलेक्ट्रॉनिक उत्पादनं ही कंपनी बनवते. अर्थात, त्यांच्या खरेदीदार संस्था सरकारी असल्यामुळे या कंपन्यांवर आयटीआयची आर्थिक कामगिरी अवलंबून असते. सरकारी टेलिफोन कंपन्यांनी ऑर्डर दिली तर या कंपनीची चलती असते. (ITI Share Price)
तेच मागच्या महिनाभरात पाहायला मिळालं. २७ मे २०२५ रोजी कंपनीने जाहीर केलेल्या तिमाही निकालांत कंपनीचा तोटा कमी झालेला दिसून आलं. तर महसूल १०,३४५ दशलक्ष रुपये इतका असल्याचं समोर आलं. शिवाय कंपनीच्या एनक्रिप्शनसाठी आवश्यक उपकरणांना चांगला उठाव मिळाला. शिवाय कंपनीने तयार केलेल्या संरक्षणविषयक उपकरणांना चांगलं रेटिंग मिळाल्याचंही कंपनीने अलीकडेच जाहीर केलं. या सकारात्मक बातम्यांमुळे शेअरमध्येही महिनाभरात तब्बल ५२ अंश म्हणजे २० टक्क्यांची तेजी दिसून आली. पण, आता हा भर ओसरला असून आठवडाभरात शेअरमध्ये दीड टक्क्यांची घसरण झाली आहे. शुक्रवारी हा शेअर ६ अंशांच्या घसरणीसह ३२३ रुपयांवर बंद झाला. (ITI Share Price)
(हेही वाचा – NCP SP : ‘खासदार पाठीशी, पण आमदार सत्तेच्या वाटेवर?’; शरद पवार गट एकत्र येण्याची चर्चा)
आयसीआरए या क्रेडिट रेटिंग एजन्सीनेही या कंपनीच्या काही उपकरणांचं रेटिंग ए प्लसवर नेलं आहे. कर्जाचं व्यवस्थापन सुरळीत सुरू असल्याचं हे द्योतक आहे. शिवाय कंपनीने सरकारी संस्था आणि मंत्रालयांकडून मिळालेल्या ऑर्डर वेळेत पूर्ण केल्या आहेत. नियमितपणे आलेल्या ऑर्डरमुळे कंपनाचा ताळेबंदही सुधारला आहे. या गोष्टींमुळे कंपनीबद्दल सकारात्मक चित्र निर्माण होत असलं तरी काही गोष्टी घातकही आहेत. कंपनीचा तोटा अजून पूर्ण भरून निघालेला नाही. तसंच कंपनीची उत्पादन क्षमता असली तरी मूळातच ही उपकरणं बनवणं हे खर्चिक काम आहे. त्यामुळे कंपनीला कायम भांडवलाची गरज पडते आणि त्यातून कर्ज व्यवस्थापन कठीण होऊन बसतं. (ITI Share Price)
धोरणात्मक काही निर्णयही कंपनी येत्या काही दिवसांत, महिन्यात बदलणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनीही लक्षपूर्वक आपले गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत. (ITI Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community