-
ऋजुता लुकतुके
अमेरिकेतील आयात शुल्क वाढीचं संकट टळलं आणि तिमाही निकालही समाधानकारक आले तेव्हा एचडीएफसी या देशातील एका मोठ्या खाजगी बँकेचे शेअर महिनाभरात बऱ्यापैकी सावरले होते. जवळ जवळ ३ टक्क्यांची वाढ एकाच महिन्यात बघायला मिळाली होती. पण, जून महिना उजाडला आहे तोच एचडीएफसी बँकेसाठी एक वेगळंच प्रकरण घेऊन. लिलावती रुग्णालयाच्या विश्वस्त निधी म्हणजे ट्रस्टने एका जुन्या कर्जाच्या बाबतीत एचडीएफसी बँकेनं कागदपत्रांची फेरफार केल्याचा आरोप केला आहे. तो दस्तऐवज सादर करून खळबळ माजवली आहे. एचडीएफसी बँकेनंही या आरोपाला उत्तर दिलं आहे आणि आता कायदेशीर लढाई सुरू होणार आहे. (HDFC Bank Share Price)
पण, या दरम्यान एचडीएफसी बँकेच्या शेअरना याचा फटका बसला. या आठवड्याभरात शेअरमध्ये तब्बल ६२ अंशांची घसरण झाली. टक्केवारीत सांगायचं झालं तर ही घसरण ३ टक्क्यांची होती. शुक्रवारीही हा शेअर २३.९० अंशांच्या घसरणीसह १,९१९ रुपयांवर बंद झाला. (HDFC Bank Share Price)
(हेही वाचा – Wimbledon 2025 : विम्बल्डनच्या बक्षिसाच्या रकमेत विक्रमी वाढ; जाणून घ्या विजेत्याला किती रक्कम मिळणार?)
एचडीएफसी बँक आणि लिलावती रुग्णालय ट्रस्टमधील हे प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूया,
मागची ३ दशकं एचडीएफसी बँक आणि लिलावती ट्रस्ट एकमेकांशी व्यवहाराने जोडलेल्या आहेत. कीर्तीलाल मणिलाल मेहता आणि त्यांच्या पत्नी लिलावती मेहता यांची स्पेंडर जेम्स नावाची एक कंपनी आहे. १९९५ मध्ये ती स्थापन झाली होती. या कंपनीनेच लिलावती ट्रस्टची स्थापना केली आहे. कीर्तीलाल मेहता यांचा मुलगा किशोर मेहता यांनी यात पुढाकार घेतला होता. स्पेंडर जेम्स कंपनीला बँकांच्या एका गटाने कर्ज दिलं होतं. या गटात एचडीएफसी ही बँकही होती. २००१ साली स्पेंडर जेम्स कंपनीला दिवाळखोर जाहीर करण्यात आलं. एचडीएफसी बँक आपली देणी वसूल करण्यासाठी विविध पर्याय तपासून पाहत होती. अशातच २००४ साली बँकेनं कर्जवसुली लवादाकडून रिकव्हरी सर्टिफिकिट मिळवलं. या पत्राच्या आधारे बँक आपलं कर्ज कायदेशीररित्या वसूल करू शकते. तीच अंमलबजावणी बँकेकडून सुरू होती. (HDFC Bank Share Price)
पण, अचानक २०२५ मध्ये लिलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टने एचडीएफसी बँकेचे तेव्हाचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्याविरोधात आरोप केले. ही आरोपांची मालिका ८ जूनपासून सुरू झाली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर जगदिशन हे चोर असून त्यांनी अनेक आर्थिक घोटाळे केले असल्याचा आरोप या ट्रस्टने केला. हे गैरव्यवहार त्यांनी ट्रस्टच्या बाबतीत केले असा अर्थातच हा आरोप आहे. म्हणजेच रिकव्हरी सर्टिफिकिटचा गैरवापर करून त्यांनी पैसे लाटल्याचा हा आरोप आहे. एचडीएफसी बँकेनं लगेचच ११ जूनला या आरोपांना उत्तर दिलं आहे. कर्जवसुलीच्या प्रक्रियेत कुठलाही गैरव्यवहार नसल्याचा दावा केला आहे. आता हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरवर त्याचा परिणाम जाणवत आहे. (HDFC Bank Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीचा सल्ला देत नाही)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community