मुंबईत २४२ जणांमुळे मिळाले ६०५ लोकांना जीवनदान

96

जगाचा निरोप घेताना आपण समाजातील अनेक गरजूंच्या आयुष्यात आनंद फुलवून त्यांचे जीवन प्रकाशमय करु शकतो. यासाठी गरज आहे ती अवयव दानाचा संकल्प करण्याची. राज्यात आतापर्यंत सुमारे २० हजार दात्यांनी अवयव दानासाठी नोंदणी केलेली आहे. तर या केंद्राच्या समन्वयातून सन २०१७ पासून आतापर्यंत ५८० मेंदू मृत (ब्रेन डेड) दात्यांनी अवयव दान केले आहे. विशेष म्हणजे ५८० मेंदू मृत दात्यांपैकी २४२ दाते हे मुंबईतील आहेत. या २४२ दात्यांद्वारे सन २०१७ पासून ३१९ व्यक्तिंना मूत्रपिंड (Kidney), १८५ व्यक्तिंना यकृत (Liver), ६७ व्यक्तिंना हृदय (Heart), २६ व्यक्तिंना फुप्फुसे (Lungs), ६ व्यक्तिंना स्वादुपिंड (Pancreas), एका व्यक्तिला आतडे (Intestine) आणि एका व्यक्तिला दुहेरी हात दान करण्यात आला आहे. याचाच अर्थ २४२ मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे ६०५ व्यक्तिंना अवयव दान करण्यात आले आहेत.

राज्यात ५८० ब्रेन डेड व्यक्तींकडून अवयव दान

केंद्राच्या समन्वयातून सन २०१७ पासून आतापर्यंत राज्यात ५८० मेंदू मृत दात्यांनी अवयव दान केले आहे. याद्वारे ७८० व्यक्तिंना मूत्रपिंड (Kidney), ४८० व्यक्तिंना यकृत (Liver), १३० व्यक्तिंना हृदय (Heart), ४३ व्यक्तिंना फुप्फुसे (Lungs), ६ व्यक्तिंना स्वादुपिंड (Pancreas), ३ व्यक्तिंना आतडे (Intestine) तर ४ हात दान करण्यात आले आहेत. याचाच अर्थ ५८० मेंदू मृत दात्यांद्वारे राज्यातील सुमारे १ हजार ४७५ व्यक्तिंना अवयव दान करण्यात आले असल्याची माहिती रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) च्या महाराष्ट्र राज्य व पश्चिम विभागाच्या केंद्र संचालक डॉ. सुजाता पटवर्धन यांनी दिली आहे.

अवयव दान काळाची गरज

अवयव दानासंबंधीच्या प्रतिक्षा यादीवर साधारणपणे ६,७४८ गरजूंची नोंदणी आहे. यामध्ये प्रामुख्याने ५,३७४ मूत्रपिंड (किडनी), १,१९४ यकृत (लिव्हर), १०१ हृदय, २१ फुफ्फुसे (Lungs), ५३ स्वादुपिंड (Pancreas) व ५ आतडे (Intestine) यासाठीच्या गरजूंचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेता आपण सर्वांनी अवयव दाता म्हणून नोंदणी करणे अतिशय महत्त्वाची समाज उपयोगी बाब असून काळाची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी केली. २७ नोव्हेंबरच्या राष्ट्रीय अवयव-दान दिनानिमित्त महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये जाऊन अवयव दान नोंदणी अवश्य करावी. अवयव दान नोंदणी केल्यावर त्याबाबतची माहिती आपले जवळचे नातेवाईक व मित्र यांना आवर्जून सांगावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के. ई. एम. रुग्णालयांचे अधिष्ठाता तथा ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.

(हेही वाचा – नाशिक हादरलं! भाजप पदाधिकारी इघेंची निर्घृण हत्या)

परळ परिसरात असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (K.E.M. Hospital) येथे देशाच्या पश्चिम विभागासाठीचे आणि महाराष्ट्र राज्याचे ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) चे कार्यालय सन २०१७ पासून कार्यरत आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच लोकमान्य टिळक महापालिका सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात ‘विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र’ (Zonal Transplant Coordination Centre / ZTCC) कार्यरत आहे. या दोन्ही कार्यालयांद्वारे आपापल्या कार्यक्षेत्रातील अवयवदाना संबंधी सर्व कार्यवाहींचे समन्वयन केले जाते.

२७ नोव्हेंबरला भारतीय अवयव दान दिवस साजरा

१२ व्या भारतीय अवयव दान दिनानिमित्त, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०२०-२१ या वर्षासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले आहेत. या अंतर्गत सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीचा पुरस्कार हा आपल्या के. ई. एम. रुग्णालयात असणा-या महाराष्ट्र व पश्चिम विभागासाठीच्या ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) या केंद्राला जाहीर झाला आहे. या केंद्राद्वारे ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्रात ८८ मेंदू मृत अवयव दात्यांद्वारे एकूण २४४ अवयवांचे दान करण्यात आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्र व पश्चिम विभागीय केंद्राचा गौरव करण्यात येत आहे. दरवर्षी २७ नोव्हेंबर रोजी भारतीय अवयव दान दिवस साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे २७ नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण भारतात १२ वा भारतीय अवयव दान दिवस साजरा केला जात आहे. या प्रसंगी के. ई. एम. रुग्णालय आणि रोट्टो सोट्टो, मुंबई यांच्यावतीने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि के. ई. एम. रुग्णालयामध्ये मृत अवयव दात्यांसाठी स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.