प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) 3 जहाजांचा ताफा मिळाला आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बीएसएफसाठी 9 फ्लोटिंग बॉर्डर आउट पोस्टपैकी 3 जहाजे त्यांना समर्पित केली आहेत. नवीन जहाजांच्या समावेशाने सागरी सीमांचे संरक्षण अधिक मजबूत होईल, असा विश्वास बीएसफच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जहाजे देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची
या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सागरी सीमांच्या सुरक्षेत जहाजे महत्त्वाची भूमिका वठवतात. ही जहाजे समुद्रात गस्त घालताना मोठी मदत करतील आणि लहान बोटींना पेट्रोल, पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी मदत करतील. ही सर्व जहाजे भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर तैनात केली जाणार आहेत. स्वदेशी बनावटीची एफबीपीओ जहाजे भारताच्या पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर धोरणात्मक बेस स्टेशन म्हणून काम करतील. ही जहाजे देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहेत आणि देशाच्या किनारी आणि आंतर्देशीय जलमार्गांद्वारे व्यापाराला चालना देण्यासाठी देखील मदत करतील. कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) ने बीएसएफला तीन जहाजे पुरवली आहेत, जी भारत-पाकिस्तानच्या 3 हजार 323 किमी आणि भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेच्या 4 हजार 096 किमी अंतरावर जमीन आणि समुद्र सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरतील.
(हेही वाचा भारीच! मुलीच्या लग्नाचा अवांतर खर्च टाळून, केले असे कौतुकास्पद कार्य)
जहाजांच्या ताफ्याचे संख्याबळ 12
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला तीन जहाजांचा ताफा बीएसएफकडे सुपूर्द करण्यात आला होता आणि पुढील तीन जहाजांचा ताफा लवकरच बीएसएफकडे सुपूर्द केला जाईल. या जहाजांच्या समावेशामुळे, बीएसएफकडे असलेल्या जहाजांच्या ताफ्याचे संख्याबळ आता 12 वर पोहोचले आहे. ही जहाजे सीएसएल द्वारे डिझाइन केलेली आहेत आणि भारतीय शिपिंग नोंदणीद्वारे वर्गीकृत केली आहेत.