Mumbai Police : १० हजार द्या महिनाभर सुट्टीवर जा; सशस्त्र पोलीस दलातील ‘हजेरी सेटिंग’ एसीबीच्या कारवाईमुळे उघड

11375
Mumbai Police : १० हजार द्या महिनाभर सुट्टीवर जा; सशस्त्र पोलीस दलातील 'हजेरी सेटिंग' एसीबीच्या कारवाईमुळे उघड
  • मुंबई – हिंदुस्थान पोस्ट ब्युरो /

ड्युटी देण्यासाठी तसेच सुट्टीवर असताना हजेरी लावण्यासाठी दरमहा दहा हजार रुपयाची मागणी केल्याप्रकरणी सशस्त्र दलाच्या एका पोलीस अंमलदारावर मुंबई अँटी करप्शन ब्युरोने केलेल्या कारवाईनंतर मुंबई सशस्त्र पोलीस दलात सुरु असलेल्या हजेरी सेटिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) मनुष्यबळाची उणीव असताना सशस्त्र पोलीस दलात सुरु असलेल्या हजेरी सेटिंगमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एसीबीच्या कारवाईनंतर सशस्त्र दलात हजेरी सेटिंगचा प्रकार कशाप्रकारे सुरु असतो याची संपूर्ण माहिती असणारा एक मेसेज पोलीस दलात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सशस्त्र दलातील ३० टक्के पोलीस अंमलदार हजेरी सेटिंग करून कामावर गैरहजर राहत आहे, तर २० टक्के पोलीस अंमलदार नियमित रजेवर जातात आणि उर्वरित ५० टक्के पोलीस अंमलदार सशस्त्र दलात इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावत असल्याचा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. (Mumbai Police)

सशस्त्र पोलीस विभाग हा मुंबई पोलीस दलाचा एका भाग आहे, या सशस्त्र दलाला ‘ल’ विभाग संबोधले जाते. मुंबईत सशस्त्र विभागाचे पाच मुख्यालय आहेत, नायगाव, वरळी, मरोळ, ताडदेव आणि कलिना येथील कोळे कल्याण असे पाच विभाग आहे. या विभागाला एका अतिरिक्त पोलीस आयुक्त, एक पोलीस उपायुक्त, एक सहाय्यक पोलीस आयुक्त आणि प्रत्येकी मुख्यालयात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रत्येकी दोन पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि जवळपास दहा हजार पोलीस अंमलदार सशस्त्र पोलीस दलात काम करतात. तुरुंगातून आरोपींना न्यायालयात ने-आण करणे, अंगरक्षक, न्यायालय, बँक, इतर खाजगी आणि शासकीय विभाग आणि खाजगी इसमांना पोलीस सुरक्षा पुरवणे यासाठी सशस्त्र पोलीस दलाची जबाबदारी आहे. नवीन पोलीस भरतीमधील पोलीस शिपायांना सर्वात प्रथम सशस्त्र विभागात काही वर्षे काम करावे लागते. त्यानंतर त्यांना पोलीस ठाणे व इतर महत्त्वाच्या ठिकाणी पाठवले जाते. या विभागात आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे पोलीस अधिकारी आणि अंमलदार या विभागात काम करण्यासाठी पुढे येत नाही, शिक्षा म्हणून पोलीस दलातील अनेकांची बदली सशस्त्र विभागात केली जाते. (Mumbai Police)

(हेही वाचा – श्रीरंगपटना जामिया मशिदीच्या एएसआय सर्वेक्षणासाठी कर्नाटक High Court ची सरकारला नोटीस)

सशस्त्र पोलीस दलात प्रत्येक ‘ल’ विभागात सरासरी ४० पोलीस अंमलदारांची कंपनी असते, या अंमलदारांना कर्तव्य वाटप करण्यासाठी कंपनी कारकून आणि ‘एनसीओ’ म्हणून ६ महिन्यांसाठी नेमणूक केली जाते. कारकून आणि ‘एनसीओ’ च्या नेमणुकीसाठी इच्छुक प्रत्येक पोलीस अंमलदारांना काही रक्कम द्यावी लागते असा आरोप व्हायरल मेसेज मध्ये करण्यात आला आहे. हे कंपनी कारकून आणि ‘एनसीओ’ कडून सशस्त्र दलातील पोलीस अंमलदार यांना ड्युटी वाटप आणि हजेरी सेटिंगसाठी पैशांची मागणी केली जाते. यासाठी दर ठरविण्यात आलेले आहे. गैरहजर असताना हजेरी लावण्यासाठी एका दिवसाचा दर ३०० ते ४०० रुपये महिनाभर गैरहजर राहण्यासाठी ९ ते १० हजार रुपये दरमहा द्यावा लागतो. याप्रकारे सशस्त्र दलातील अंमलदार मोठ्या प्रमाणात गैरहजर राहून हजेरी सेटिंग करून घेतात, हजेरी सेटिंग्जवर गेलेले अंमलदार हे स्वतःची खाजगी कामे तसेच शेतीची कामे करणे, इत्यादी कामे हजेरी सेटिंगमध्ये करून घेत असतात असे एका पोलीस (Mumbai Police) शिपायाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले. हा सशस्त्र दलात हा प्रकार नवीन नाही, पूर्वीपासून हा हजेरी सेटिंगचा प्रकार सुरु आहे, परंतु याबाबत कोणी कधीही आवाज उचलत नाही, ज्या अंमलदाराने याबाबत आवाज उचलला त्याला त्रासदायक ठिकाणी कर्तव्यावर पाठवले जात असल्याचे मेसेजमध्ये आरोप करण्यात आला आहे. (Mumbai Police)

व्हायरल मेसेजमध्ये असाही आरोप करण्यात आला आहे की, नेमणूक केलेले कारकून पोलीस अंमलदार हे आपल्या कंपनी मधील जवळपास ३० टक्के इच्छुक पोलीस (Mumbai Police) अंमलदार यांच्याकडून दिवसाला ४०० ते ५०० व महिन्याला प्रत्येकी ९ ते १० हजार रुपये घेऊन सेटिंग सुट्टीवर सोडतात व इतर शिल्लक ७० टक्के पोलिसांपैकी जवळपास २० टक्के पोलिसांना (Mumbai Police) चांगली सौम्य ड्युटी देण्यासाठी, रजा पास करण्यासाठी व त्रास न देण्यासाठी देखील त्यांच्याकडून महिन्याला ४ ते ५ हजार रुपये व भेटवस्तू घेतात असा आरोप व्हायरल मेसेज मध्ये करण्यात आला आहे. या व्हायरल मेसेज बाबत सत्यता जाणून घेण्यासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने मुंबई पोलीस दलातील अनेक पोलीस अंमलदार तसेच सशस्त्र पोलीस दलातील अंमलदारांकडे चौकशी केली असता त्यांनी नावे न छापण्याच्या अटीवर व्हायरल मेसेजध्ये जे काही मांडले आहे ते सत्य आहे, परंतु हे नवीन नाही खूप पूर्वीपासून हा प्रकार सुरु आहे. आपली खाजगी कामे करून घेण्यासाठी, तसेच खाजगी व्यवसाय करणारे अनेक पोलीस अंमलदार सशस्त्र दलात बदली करून घेतात असे अनेकांनी सांगितले. सशस्त्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नायगाव, वरळी येथील मुख्यालय येथे ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या प्रतिनिधींनी भेट दिली. परंतु त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (Mumbai Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.