‘हप्ता नही दिया तो काट डालुंगा’; ‘डब्बा बाटली गँग’ची सांताक्रूझमध्ये दहशत

100
'हप्ता नही दिया तो काट डालुंगा'; 'डब्बा बाटली गँग' ची सांताक्रूझमध्ये दहशत
'हप्ता नही दिया तो काट डालुंगा'; 'डब्बा बाटली गँग' ची सांताक्रूझमध्ये दहशत

‘मेरे गँग के छोकरो को, सुधारने की कोशीस मत करना, वरना काट डालुंगा, हप्ता टाईमपर आना चाहीए,’ या आशयाची धमकी ‘डब्बा बाटली गँग’चा लीडर इस्माईल पेंटर याने व्यसनमुक्ती संस्थेच्या एका कार्यकर्त्याच्या भावाला दिल्याची तक्रार वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. सांताक्रूझ पूर्वेतील वाकोला पोलिसांनी ‘डब्बा बाटली गँग’चा लीडर आणि त्याच्या टोळीविरुद्ध धमकी, खंडणी आणि शस्त्रबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सांताक्रूझ पूर्व गावदेवी परिसरात इस्माईल पेंटर याने त्याच परिसरातील १८ ते २५ वयोगटातील मुलांना एकत्र करून ‘डब्बा बाटली गँग’ नावाची एक गँग तयार केली आहे. या गँगचा लिडर इस्माईल पेंटर याने आपल्या टोळीतील मुलाना गांज्याचे व्यसन लावले आहे. ही टोळी रिक्षा चालक, फेरीवाले यांना तलवार, चॉपरचा धाक दाखवुन हप्ता वसुली करतात आणि त्यांना विरोध करणाऱ्यांवर ही टोळी हल्ला करते. या टोळीची या परिसरात मोठी दहशत असून दिवसाढवळ्या या टोळीतील मुले तलवार, चॉपर सारखे घातक हत्यारे घेऊन परिसरात फिरत असतात, येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटतात.

या टोळीवर आणि टोळी प्रमुख इस्माईल याच्यावर वाकोला पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून, या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर ही टोळी हल्ला करते अशी माहिती स्थानिकांनी दिली. या टोळीच्या दहशतीला घाबरून अनेक जण पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे धाडस करीत नाहीत. गावदेवी परिसरात राहणारा एक तरुण ‘मुर्तृझा फाउंडेशन’मध्ये काम करतो, ही संस्था व्यसनमुक्तीसाठी काम करते. या संस्थेत काम करणारा तरुण हा ‘डब्बा बाटली चाळ’ या टोळीतील मुलांना व्यसनमुक्तीकडे आणण्याचा प्रयत्न करीत होता, ही बाब या टोळीचा प्रमुख इस्माईल पेंटर याला कळताच त्याने आपल्या टोळीतील काही मुलांना सोबत घेऊन तलवार, चॉपरसह मुर्तृझा फाउंडेशनसाठी काम करणाऱ्या तरुणाच्या घरावर चालून गेले.

(हेही वाचा – Heavy Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट; घाट परिसरात भूसख्खलनाची भीती)

सुदैवाने हा तरुण घरी नसल्यामुळे बचावला. मात्र, या टोळीचा प्रमुख इस्माईल याने या तरुणाच्या भावाला धमकी देऊन ‘तेरे भाई को समजा के रख, अपने लडको को सुधारनेका नही, नही तो इधर ही खल्लास कर दुगा, और हप्ता टाईमपर देने का’ अशी धमकी देत त्या ठिकाणी जमलेल्या जमावाला तलवारीचा धाक दाखवून ‘कोई बीच मे आया तो काट डालुंगा,’ अशी धमकी देत निघून गेला. या टोळीच्या धमकीला घाबरलेल्या तरुणाने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेऊन सोमवारी रात्री या टोळीविरोधात आणि इस्माईल पेंटर विरोधात तक्रार दाखल केली. वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या टोळीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.