
-
प्रतिनिधी
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये एका चोरट्याने एका प्रवासी महिलेची बॅग खेचण्याचा प्रयत्नात ही महिला धावत्या ट्रेनमधून खाली पडली. महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा पती देखील ट्रेनमधून पडल्याने त्याला आपला एक हात गमवावा लागला आहे. ही घटना मुंबईतील घाटकोपर कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान घडली असून, या जखमी दाम्पत्याला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दाम्पत्य नवी मुंबईतील पनवेल येथे राहणारे असून दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुर्ला रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून या चोरट्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Railway Accident)
योगेश देशमुख (५०) आणि दीपाली देशमुख (४४) असे या जखमी दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असून कुटुंबासह नवी मुंबईतील पनवेल येथे वास्तव्यास आहेत. योगेश आणि दीपाली देशमुख त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीसोबत लातूरला एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होते. बुधवारी पहाटे ३.३५ च्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एलटीटी-नांदेड स्पेशलच्या बोगी क्रमांक एस-४ मध्ये त्या चढल्या. त्यानंतर लगेचच त्या झोपी गेल्या. (Railway Accident)
(हेही वाचा – BMC : विद्युत कामे करणारी कंपनी पकडणार भटक्या जनावरांना; कुठे चालली आहे मुंबई महापालिका?)
दीपाली मधल्या बर्थवर होती तर पती योगेश वरच्या बर्थवर होते. दीपाली यांनी त्यांची हॅंडबॅग (पर्स) स्वतःच्या खांद्याला अडकवून झोपी गेल्या होत्या. सुमारे १५ मिनिटांनी ट्रेन भांडुप आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान असताना एक अनोळखी व्यक्ती दीपाली यांच्या बर्थवर जवळ आला आणि त्या अनोळखी व्यक्तीने दीपाली यांच्या खांद्याला अडकवलेली लेडीज हॅन्ड पर्स बळजबरीने खेचण्याचा प्रयत्न केला. दीपाली यांनी त्याला विरोध करताच त्या व्यक्तीने दीपाली यांना खेचत ट्रेनच्या दरवाज्यापर्यंत आणून त्याने बॅगेसह धावती ट्रेन सोडली. त्यात दीपाली या देखील ट्रेन खाली पडल्या. पत्नी ट्रेनमधून पडल्याचे बघून योगेश देशमुख यांनी ट्रेनमधून खाली उडी मारली व त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले व त्यांचा डावा हात कोपऱ्यापासून तुटून शरीरापासून वेगळा झाला. (Railway Accident)
हे बघून पत्नीने स्वतःच्या ड्रेसची एक बाजू फाडून रक्ताने माखलेला पतीचा हात बांधला आणि मदतीसाठी कोण दिसतंय क ते पाहिले. मात्र पहाटेची वेळ असल्याने कोणीच दिसत नव्हते. दीपाली यांनी धाडस दाखवून जखमी पतीला रेल्वे रुळावरून बाहेर आणले आणि रिक्षा चालक आणि दूध टेम्पो चालकाच्या मदतीने फोर्टिस रुग्णालय गाठले. या घटनेची माहिती मिळताच कुर्ला रेल्वे पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन दीपाली यांचा जवाब नोंदवून अनोळखी चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या चोराच्या शोधासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते भांडुप रेल्वे स्थानकादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. (Railway Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community