मुंबई पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अनेकांवर कारवाई

118

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून शहरासह उपनगरात राबविण्यात आलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान ५०० पेक्षा अधिक गुंडाची धरपकड करण्यात आली असून २९ फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याच बरोबर लॉजेस, हॉटेलची तपासणी करून २२३ठिकाणी कॉम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले आहे.

( हेही वाचा : मुंबई आणि कन्याकुमारी दरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणार विशेष ट्रेन; जाणून घ्या सविस्तर)

थर्टीफर्स्ट जल्लोषात साजरा करण्यासाठी मुंबईकर सज्ज झालेले असतांना या जल्लोषाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. मावळत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करतांना शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी थर्टीफर्स्टच्या आदल्या दिवशी ‘ऑल आऊट ऑपरेशन'(प्रतिबंधक कारवाई ) राबविण्यात आले.

मुंबई शहरातील पाच प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, १३ परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा, सुरक्षाविभाग ४१ विभागीय सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात ऑल आऊट ऑपरेशनची कार्यवाही केली.

पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी व कोबिंगच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन केले व ऑल आऊट ऑपरेशन प्रभावीपणे राबविण्यात आले आहे. ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान मुंबई पोलिसांच्या अभिलेखावरील २९ फरारी आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच १३१ अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत १६४ कारवाया करण्यात आल्या असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ३१ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. ७३ अवैध मद्यविक्री, जुगाराच्या अड्डयावर छापेमारी करण्यात आली आहे, तसेच ३८ अवैध धंद्यावर कारवाई करून ५५ जणांना अटक करण्यात आली आहे. तडीपार करून देखील शहरात लपून छपून राहणाऱ्या एकूण ६८जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १२०, १२२ व १३५ अन्वये संशयितरित्या वावरणाऱ्या इसमांवर एकूण १४८ कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंबईतील एकुण २२३ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले, त्यामध्ये अभिलेखावरील १४७१ आरोपीना तपासण्यात आले, यात २७१ आरोपी सापडले. त्यांच्यावर गुणवत्तेप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. शहरासह उपनगरातील १७८ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली यादरम्यान ८६९० वाहनांची तपासणी करण्यात आलेली असून मोटार वाहन कायद्यांतर्गत २३०० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये ६० वाहन चालकांवर ड्रक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने एकूण ८७२ हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने मर्मस्थळे व संवेदनशील ठिकाणी अशा एकूण ५५५ ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.