Mumbai Crime : ‘कॅफे म्हैसूर’ च्या मालकाला लुटणाऱ्या पोलिसांसह ६ जणांना ७ दिवसांची पोलीस कोठडी

412
Mumbai Crime : 'कॅफे म्हैसूर' च्या मालकाला लुटणाऱ्या पोलिसांसह ६ जणांना ७ दिवसांची पोलीस कोठडी
Mumbai Crime : 'कॅफे म्हैसूर' च्या मालकाला लुटणाऱ्या पोलिसांसह ६ जणांना ७ दिवसांची पोलीस कोठडी

माटुंग्यातील प्रसिद्ध ‘कॅफे म्हैसूर’ (Cafe Mysore) मालकाच्या घरी क्राईम ब्रँच अधिकारी बनून २५ लाख रुपयांची लूट करणाऱ्या मुंबई पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागाच्या दोन पोलीस चालकासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने या गुन्ह्यासाठी मुंबई पोलिस वाहनांचा वापर केल्याचे समोर आले आहे. या टोळीला बुधवारी कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने अटक आरोपीना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Mumbai Crime)

बाबासाहेब भागवत (५०), दिनकर साळवे (६०),वसंत नाईक (५२), शाम गायकवाड (५२),नीरज खंडागळे (३५) आणि सागर रेडेकर असे अटक करण्यात आलेल्या टोळीचे नावे आहेत. या टोळीत आणखी काही सेवानिवृत्त पोलिसांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बाबासाहेब भागवत आणि दिनकर साळवे हे दोघे मुंबई पोलिस दलात मोटार वाहन विभागात पोलीस चालक म्हणून नोकरीला होते. साळवे हा सेवानिवृत्त असून भागवत हा एका बड्या पोलीस अधिकारी यांच्या वाहनावर चालक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. भागवत हा कुर्ला पश्चिम बुद्ध कॉलनी आणि दिनकर साळवे हा कुर्ला पूर्व नेहरू नगर येथे राहण्यास आहे. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Mumbai Crime : माटुंग्यातील प्रसिद्ध ‘म्हैसूर कॅफे’ मालकाच्या घरावर दरोडा, निवृत्त पोलीस दरोड्यात सामील; नेमकं काय घडलं?)

या टोळीतील वसंत नाईक हा कॅफे म्हैसूर’ (Cafe Mysore) हॉटेलचा मॅनेजर होता, त्याला वर्षभरापूर्वी कामावरून काढण्यात आल्यानंतर त्याने मालकाला लुटण्याची योजना आखली होती. ‘कॅफे म्हैसूर’ (Cafe Mysore) च्या मालकाची इत्यंभूत माहिती नाईक कडे होती. मालकाच्या सायन येथील घरी मोठी रक्कम ठेवलेली असते हे नाईकला माहीत होते. मालकाला लुटण्याची योजना आखण्यासाठी वसंत ने सागर रेडेकर याला तयार केले, परळ येथे राहणारा सागर याच्या संपर्कात असलेल्या शाम गायकवाड याला ही योजना सांगण्यात आली. शाम गायकवाड याने त्याच्या संपर्कात असलेले मोटार वाहन विभागातील पोलीस चालक भागवत आणि दिनकर साळवे यांना लूट ची योजना सांगितली. (Mumbai Crime)

ज्या दिवशी कॅफे म्हैसूर’ (Cafe Mysore) हॉटेलचा मालकाच्या घरी मोठी रक्कम असेल त्याच दिवशी क्राईम ब्रँच अधिकारी बनून जायचे आणि लूट करण्याचा बेत आखण्यात आला. दरम्यान कॅफे म्हैसूर’च्या मालकाच्या घरात जवळपास २० कोटींची रोकड असल्याची माहिती या टोळीला मिळाली होती.सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एक पोलीस व्हॅन आणि एक खाजगी वाहनातून सायन येथे कॅफे म्हैसूर (Cafe Mysore) मालक नरेश नायक यांच्या घरी आले, त्यावेळी नरेश नायक हे एकटेच घरात होते. या ६ जणांच्या टोळीपैकी ५ जण आत शिरले व त्यांना पोलीस ओळखपत्र दाखवून क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून तुमच्या घरात निवडणूकीची रोकड असल्याची माहिती आम्हाला मिळाली असे बोलून दोन जणांनी घराची झडती घेऊन घरातील कपाटातील २५ लाख रुपये काढून त्यांना घाबरवून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मिडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक – क्षीरसागर)

नरेश नायक यांनी ही रोकड हॉटेल व्यवसायतील असल्याचे सांगून देखील त्यांनी नरेश नायक यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन प्रकरण मिटविण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी नायक यांच्याकडे केली. नायक यांनी माझ्याकडे एवढी रक्कम नसल्याचे सांगताच या टोळीने २५ लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.

नायक यांना हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटले. पण धमक्यांना तो घाबरला होता. “आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नायक यांनी सायन पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायन पोलिसांनी भादवी कलम १७० (लोकसेवक व्यक्ती करणे), ४२० (फसवणूक), ४५२ (दुखापत, प्राणघातक हल्ला किंवा चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध करणे) ५०६ (गुन्हेगारी धमकावणे) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Crime)

सायन पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू केला व दोन तासात दिनकर साळवे आणि भागवत या दोन पोलिसांना अटक करण्यात आली. मंगळवारी इतर चौघांना अटक करण्यात आली असून अद्याप गुन्ह्यात वापरलेली पोलीस व्हॅन आणि दुसरे खाजगी वाहन आणि लुटलेली २५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली नाही. अटक आरोपीना बुधवारी कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.