Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला सोमवारी हरयाणाच्या हिस्सार न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेथून न्यायालयाने ज्योतीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी ज्योतीला पाच दिवस आणि नंतर चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. सध्याचा चार दिवसांचा रिमांड कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ज्योतीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Jyoti Malhotra)
ज्योतीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ज्योतीचा रिमांड सोमवारी संपला. हिस्सार पोलिसांनी तिला तिसऱ्यांदा न्यायालयात हजर केले. तेथून तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तत्पूर्वी, हिसार पोलिसांच्या आर्थिक कक्षाने ज्योतीची २ दिवस चौकशी केली. मात्र, पोलिसांना फारसे काही सापडले नाही. ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा म्हणाले की, पोलीस घरी आले होते. त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी त्यांना ज्योतीच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात येऊ नका असे सांगितले आहे. तसेच आपल्या मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तिला भेटू देण्यास नकार दिला.
सुरक्षा रक्षकांसोबतचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल दरम्यान, स्कॉटलंडमधील एका युट्यूबरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा देखील दिसत आहे. व्हिडिओमधील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्योतीच्या मागे AK-47 ने सज्ज असलेले काही सुरक्षा कर्मचारी देखील दिसत आहेत, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओच्या प्रसिद्धीनंतर ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा व्हिडिओ स्कॉटिश युट्यूबर कॅलमचा आहे, ज्यामध्ये ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या न्यू अनारकली मार्केटमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्यास्कॉटिश युट्यूबर कॅलम उपस्थिती आणि ज्योती मल्होत्राची हालचाली संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा अहवाल आला समोर
हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणातील हिसार येथील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्याबद्दल पोलिसांना एकामागून एक महत्त्वाचे पुरावे मिळत आहेत. पोलिसांनी ज्योतीकडून १ लॅपटॉप आणि ३ मोबाईल फोन जप्त केले होते. हे सर्व जप्त केल्यानंतर, ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. फॉरेन्सिक टीमने या डिजिटल उपकरणांमधून १२ टीबी डिजिटल डेटा जप्त केला आहे. ज्योतीच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या तपासणीचा अंतिम अहवाल पोलिसांना मिळाला आहे.
ज्योती मल्होत्रा हिच्या गॅझेट्सच्या फॉरेन्सिक अहवालानुसार, पाकिस्तानसाठी हेरगिरीचे काही दुवे सापडले आहेत. पोलिसांनी अद्याप ज्योती मल्होत्राची कोठडी मागितलेली नाही. ते म्हणाले की, प्रथम डिजिटल पुराव्यांची सखोल चौकशी केली जाईल. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्योती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या (पीआयओ) संपर्कात होती आणि त्यांच्याबद्दल तिला संपूर्ण माहिती होती. डिजिटल पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले की ज्योती कोणत्याही ग्रुप चॅटमध्ये सहभागी नव्हती तर फक्त एकट्याने होणाऱ्या संभाषणात सहभागी होती.
दुसऱ्यांदा पाकिस्तानचा खास व्हिसा मिळाला पहिल्यांदा पाकिस्तानला भेट दिल्यानंतर ज्योतीला विशेष व्हिसा मिळाला होता. ज्याला आयएसआय आणि पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाची मान्यता होती. या ट्रिपचा व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर, त्याचे सोशल मीडिया फॉलोअर्स आणि व्ह्यूज झपाट्याने वाढले. हिसार पोलिसांचा असा विश्वास आहे की ज्योतीने जाणूनबुजून आयएसआयच्या योजनांना पाठिंबा दिला जेणेकरून तिला विशेष सुविधा आणि व्हीआयपी वागणूक मिळावी. सोशल मीडियावरील प्रभावकांना आकर्षित करण्यासाठी ही पद्धत आयएसआयची एक सामान्य युक्ती मानली जाते.