Saquib Nachan: इसिस कनेक्शन; पडघ्यातील साकीब नाचनच्या शमील याला एनआयएकडून अटक

137

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने इसिस कनेक्शन प्रकरणात पडघ्यातून साकीब नाचन याचा मुलगा शमील नाचन याला अटक केली आहे. या प्रकरणातील ही सहावी अटक असून यापूर्वी दोघांना नागपाडा येथून, पुण्यातून एकाला आणि पडघ्यातुन ही चौथी अटक आहे. एनआयएने आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक केली आहे. शमील नाचन ही सातवी अटक असून शमील हा २००३ मध्ये झालेल्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटा तील दोषी आरोपी साकीब नाचन चा मुलगा आहे. शमीलने दहशतवादी कृत्यासाठी ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस'(आयईडी) बनविण्याचे प्रशिक्षण घेतले असून ते बनविण्यासाठी त्याचा समावेश आढळून आला असल्याचे एनआयए या तपास यंत्रणेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

एनआयएने मागील महिन्यात इसिस संघटनेचे संबंधित मुंबईतील नागपाडा येथून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. एटीएस आणि एनआयएने पुणे, ठाणे आणि मुंबईतून अटक करण्यात आलेल्या संशयित यांचे एकमेकांशी कनेक्शन समोर आले असून हे दोन्ही इसिसने तयार केलेले मॉड्युल असून हे दोन्ही मॉड्युलला इसिसने दोन वेगवेगळी नावे दिली होती.जुल्फिकार याला पडघ्यातुन अटक केल्यानंतर त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत पडघा येथे जुल्फिकार याला राहण्याची जवाबदारी अकिब नाचन याच्यावर होती, व त्याने जुल्फिकार आणि पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जुबेर नूर मोहंमद शेख यांना भाड्याने घरे घेऊन दिली होती. एनआयएच्या तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे एनआयए ने तपास सुरू केला होता, दरम्यान शुक्रवारी एनआयएच्या अधिकारी यांनी अकिब नाचन याच्या पडघ्यातील घरी छापेमारी करून त्याला अटक करण्यात आली होती, दरम्यान एनआयए च्या तपासात मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी साकीब नाचन याच्या मुलगा शमील याचा या प्रकरणाशी सबंध आढळून आल्यानंतर एनआयए शुक्रवारी पडघा येथून शमील नाचन याला अटक केली.

(हेही वाचा Bombay High Court : खड्ड्यांच्या मुद्द्यावरून न्यायालयाने महापालिकेनंतर राज्य सरकारला सुनावले)

शमिलसह इसिस स्लीपर मॉड्यूलचे हे सदस्य पुण्यातील कोंढवा येथील घरातून दहशतवादी कृत्यासाठी स्फोटके तयार करीत होते, त्यासाठी त्यांनी आयईडी एकत्र केले होते. बॉम्ब तयार करण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी बॉम्ब प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्यात भाग घेतला होता. त्यांनी बनवलेल्या आयईडीची चाचणी घेण्यासाठी त्यांनी पडघ्यात नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता अशी माहिती समोर आली आहे.

पडघ्यात पुन्हा दहशतवाद्याच्या हालचाली….

एनआयएच्या छापेमारी मुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळ असणारे पडघा गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एनआयएने मागील महिन्यात पडघा येथून झुल्फिकार आणि शरजिल शेख या दोघांना अटक केली होती, त्यानंतर तिसरी अटक अकिब नाचन याला करण्यात आली, शुक्रवारी साकीब नाचन याचा मुलगा शमील नाचन याची चौथी अटक आहे. २००२ आणि २००३ साली मुंबईतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक , विलेपार्ले आणि मुलुंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पडघ्यातुन साकिब नाचनला अटक केली होती. नाचन याच्या अटकेमुळे पडघा गाव हे पहिल्यांदाच चर्चेत आले होते. पडघा येथे असलेल्या डोंगराळ भागात दहशतवाद्याना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे समोर आले होते. साकीब नाचन याला अटक केल्यानंतर दहशतवाद प्रतिबंधक कायदा (पोटा) अंतर्गत शस्त्रे बाळगल्याबद्दल नाचनला दोषी ठरवण्यात आले आणि त्याला न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात होती. तुरुंगातून सुटल्यानंतर नाचन आपल्या नातेवाईकांसह पडगा या मूळ ठिकाणी पुन्हा राहण्यास आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.