Hindustan Post Impact : सशस्त्र दलाचे दोन कॉन्स्टेबल्स निलंबित; विभागीय चौकशी सुरू

97
Hindustan Post Impact : सशस्त्र दलाचे दोन कॉन्स्टेबल्स निलंबित; विभागीय चौकशी सुरू
  • प्रतिनिधी 

तुरुंगात असलेला ड्रग्ज माफिया इम्रान खानला न्यायालयातून तुरुंगात घेऊन जाण्याऐवजी त्याला मोकाट सोडल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलाच्या सशस्त्र विभागाच्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर विभागीय चौकशी बसविण्यात आली आहे. अखेर दोन्ही कॉन्स्टेबल निलंबित. संदीप सूर्यवंशी आणि अमोल सरकाले अशी या दोन्ही कॉन्स्टेबल्सची नावे आहेत. अमोल सरकाले हा पाच ते सहा वर्षांपासून तैनात आहे. तर सूर्यवंशी हा ८ ते ९ महिन्यांपासून तैनात होते. ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने ‘तुरुंगातून न्यायालयात तारखेला आलेला अंडरट्रायल आरोपी मोकाट’ या आशयाची सर्वात प्रथम बातमी करून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला होता. बातमीची दखल घेऊन मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. (Hindustan Post Impact)

मुंबई गुन्हे शाखेने डिसेंबर २०२४ मध्ये अटक केलेला ड्रग्ज माफिया इम्रान खान हा सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ‘अंडरट्रायल कैदी’ म्हणून आहे. १६ मे रोजी इम्रान खान हा दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सात रस्ता येथील जे. आर. बोरीचा मार्ग येथे मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमित मटकर यांच्या कार्यालयाजवळ एका अनोळखी व्यक्तीसोबत दुचाकीवर आला आणि अमित मटकर यांना धमकी देऊन गेला. इम्रान खानने चेहऱ्यावर मास्क लावला होता आणि त्याच्या पॅन्टच्या मागच्या खिशात मोबाईल फोन होता. हा सर्व प्रकार मटकर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Hindustan Post Impact)

(हेही वाचा – Imran Khan : तुरुंगातून न्यायालयात तारखेला आलेला अंडरट्रायल आरोपी मोकाट !)

तुरुंगात असलेला इम्रान खान हा तुरुंगातून बाहेर कसा आला याबाबत सविस्तर चौकशी केली असता धक्कादायक अशी माहिती ‘हिंदुस्थान पोस्ट’ च्या हाती लागली होती. तसेच मटकर यांनी यासंदर्भात आग्रीपाडा पोलिसांना दिलेला तक्रार अर्ज आणि सीसीटीव्ही फुटेज ‘हिंदुस्थान पोस्ट’ च्या हाती लागले. १६ मे २०२५ रोजी सशस्त्र पोलीस दलाचे दोन कॉन्स्टेबल इम्रान खान याला तुरुंगातून दुपारी दीड वाजता सत्र न्यायालयात तारखेसाठी घेऊन आले होते. त्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात पोहचविण्याची जबाबदारी सशस्त्र दलाच्या पोलीस कॉन्स्टेबल यांच्यावर होती. मात्र दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास इम्रान खान हा एका दुचाकीवरून मटकर यांच्या कार्यालयावर आला आणि धमकी देऊन गेला. (Hindustan Post Impact)

अमित मटकर यांनी या प्रकरणी २१ मे २०२५ रोजी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून पुरावा म्हणून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले होते. हे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रसारित केल्यानंतर सशस्त्र दलाच्या या दोन कॉन्स्टेबल्सवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली असून विभागीय चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तसेच या दोन्ही कॉन्स्टेबल्सना निलंबित करण्यात आले आहे. (Hindustan Post Impact)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.