Terrorist : दक्षिण मुंबईतील अतीसंवेदनशील परिसर दहशतवाद्यांच्या रडारवर; एटीएसने उधळला कट

112

एटीएसने पुण्यातील कोंढवा आणि कोथरूड येथून अटक करण्यात आलेले चार संशयित दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबईतील छाबड हाऊससह दक्षिण मुंबई आणि पुण्यातील अतीसंवेदनशील परिसर होते, हे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. मुंबई-पुण्यात बॉम्बस्फोट घडवून मोठा नरसंहार घडवून आणण्याचा मनसुबा एटीएसने उधळून लावत या चौघा संशयितांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्यासह बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेले चौघे इसिस या दशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या अलसुफा या संघटनेचे दहशतवादी असल्याचे तपासात समोर आले आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) च्या पुण्यातील पथकाने मागील दोन आठवड्यात पुण्यातील कोंढवा आणि कोथरूड येथून चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यात एका डॉक्टरचा समावेश असून इतर दोघे हे स्लीपर सेल आहेत, तर रत्नागीरी येथून अटक करण्यात आलेला एक दहशतवादी हा दहशतवादी कृत्यासाठी आर्थिक रसद पुरवत होता असे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या चार पैकी दोन जणांकडून दक्षिण मुंबईतील छाबड हाऊस आणि काही अतीसंवेदनशील परिसरातील छायाचित्रे आणि नकाशे जप्त केले आहे, तसेच बॉम्ब बनविण्याचे साहित्य आणि ऑनलाइन मॅप अप्लिकेशनचे स्क्रीनशॉट मिळून आले असल्याची माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या संशयितांनी डाउनलोड केलेल्या इमेजमध्ये पुणे शहर, पुणे जिल्हा आणि मुंबईच्या काही भागांचे लोकेशन मॅपचा समावेश आहे. या संशयिताकडे ५०० जीबीचा डेटा असलेले पेनड्राईव्ह मिळून आले असून हे पेन ड्राईव्ह आणि इतर डिजिटल साहित्य तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्याची माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली.

(हेही वाचा Manipur Violence : मणिपूरच्या घटनेवर सरन्यायाधीश म्हणाले, ही पहिलीच घटना नाही, दोन्ही बाजू समजून घेणार)

पुण्यातील कोंढवा मिठा नगर येथील दोन भाड्याच्या फ्लॅटच्या झडतीत स्थानिक शहर पोलिसांना ड्रोनचे काही भाग मिळून आले होते, ते एटीएसने ताब्यात घेतल्याचे एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान एटीएसने या संशयिताकडून पुस्तके एका विशिष्ट व्यक्तीचे व्हिडिओ आणि पीडीएफ फाइल्स जप्त केलेल्या आहेत, हे साहित्य विशिष्ट धर्माच्या तरुणांना प्रवृत्त करण्यासाठी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

छाबड हाऊस, कुलाबा परिसर आणि मुंबईतील विविध ठिकाणचे जप्त करण्यात आलेले छायाचित्रे अटकेत असलेल्या मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान उर्फ अब्दुल हमीद खान (२३) आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकुद साकी (२४) यांच्याकडून जप्त केले असून या दोघांनी विशिष्ठ वेबसाईटवरून हे  डाउनलोड केल्याची माहिती एटीएसने दिली.

अटक करण्यात आलेल्या संशयितांनी व्हिडीओग्राफीसाठी ड्रोन वापरण्याची योजना आखली होती, परंतु ड्रोनचा वापर करण्यात आला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे एटीएसचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले संशयित हे अलसुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून अल सुफा ही संघटना इसिस सोबत जोडलेली असल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.