मुंबई मनपा रुग्णालयातील मोफत साहित्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एकाला अटक

152
मुंबई मनपा रुग्णालयातील मोफत साहित्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एकाला अटक
मुंबई मनपा रुग्णालयातील मोफत साहित्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एकाला अटक

मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातील साहित्यांची रुग्णालयाबाहेर विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या साहित्यांची विक्री करणाऱ्या एकाला मुलुंड पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. कृष्णा काळे (४९) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी कृष्णा काळेसह रुग्णालयातील अनोळखी कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एमटी अग्रवाल रुग्णालयाच्या आवारात रुग्णांना प्लास्टर करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य विक्रीप्रकरणी कृष्णा काळे याला अटक करण्यात आलेली असून रुग्णालयातील कर्मचारी हे साहित्य रुग्णालयातून बाहेर चोरून काढत असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काळे याच्या ताब्यात सापडलेल्या साहित्यावर मुंबई मनपाचा शिक्का आहे आणि तो २०० ते ८०० रुपये प्रति युनिटला ते रुग्णांच्या नातेवाईकांना विकत होता.

रॅकेटचा असा झाला पर्दाफाश

मुलुंड पश्चिम शास्त्री नगर येथे राहणारे रहिवासी मारुती कदम यांना अशी माहिती मिळाली होती की, मुलुंड येथील मनपाच्या एमटी रुग्णालयाच्या बाहेर अस्थीव्यंग रुग्णांच्या नातेवाईकांना प्लास्टरचे साहित्याची विक्री करीत आहे, जे साहित्य रुग्णालयात मोफत मिळते त्याची विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून कदम यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह १३ जून रोजी रुग्णालय गाठले.

(हेही वाचा – धावत्या ट्रेनमध्ये विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, CSMT स्थानकाजवळील धक्कादायक घटना)

रुग्णालयाच्या बाहेर एक व्यक्ती रुग्णाच्या नातेवाईकांना प्लास्टरचे किट २०० ते ८०० रुपयांना विकत होता, कदम यांनी प्लास्टरचे किट तपासले असता त्याच्यावर मुंबई मनपाचा शिक्का होता. जी वस्तू रुग्णासाठी मोफत आहे, त्याची विक्री होत असल्यामुळे कदम यांनी त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता तो घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, कदम आणि त्याच्या सोबत असणाऱ्या इतरांनी त्याला पकडून मुलुंड पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांना याबाबतची सूचना दिली, पोलिसांनी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत कळवले, मनपा अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात येऊन साहित्य तपासले असता हे साहित्य रुग्णालयातील असल्याचे समोर आले. ते विक्रीसाठी नसून ते साहित्य रुग्णांना मोफत दिले जाते अशी बाब समोर आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुनाथ बरगाले यांनी याप्रकरणी कृष्णा काळे यांच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, साहित्य आणि प्राथमिक पुराव्याची पुष्टी केल्यानंतर मुलुंड पोलिसांनी कृष्णा काळे आणि इतर संबंधित मनपा कर्मचारी आणि अधिकार्‍यांवर भादवी कलम ४०६ (गुन्हेगारी विश्वासभंग), ४०९ (लोकसेवकाने विश्वासघात करणे) ४२० (फसवणूक) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला. काळे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या चौकशीतून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या रुग्णालयातील अधिकाऱ्यांची नावे लवकर उघडकीस येतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.