दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध Muchhad Panwala वर तिसऱ्यांदा कारवाई; प्रतिबंधित ई-सिगारेटची करीत होता विक्री

124
दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध Muchhad Panwala वर तिसऱ्यांदा कारवाई; प्रतिबंधित ई-सिगारेटची करीत होता विक्री

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला हा पोलिसांच्या रडारवर आला आहे. देशात बंदी असलेले अमली पदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री करणाऱ्या मुच्छड पानवाल्यावर तपास यंत्रणांनी तीन वर्षात तिसऱ्यांदा छापा टाकला आहे. २०२१ मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अमली पदार्थ विक्रीच्या संशयावरून मुच्छड पानवाला कुटुंबातील एका सदस्याला अटक केली होती. तर २०२३ मध्ये मुंबई अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने मुच्छड पानवाल्यावर कारवाई करून लाखो रुपये किमतीचे ई-सिगारेट जप्त केले होते. दरम्यान बुधवारी मुंबई गुन्हे शाखेने दक्षिण मुंबईतील गावदेवी परिसरात मुच्छड पानवालाच्या गोदामात छापा टाकून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि लिक्विड (द्रव्य) जप्त केले आहे. सेलिब्रिटी ग्राहकांमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असणारा मुच्छड पानवाला बेकायदेशीर व्यवसायामुळे कुप्रसिद्धीच्या झोतात आला आहे. (Muchhad Panwala)

मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ब्रीच कँडी येथील प्रसिद्ध मुच्छड पानवाला दुकानावर छापा टाकला आणि त्याच्या गोदामातून ६.८८ लाखो रुपये किमतीच्या प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे ३७३ नग जप्त केले. पान शॉपचा मालक, लखन कुमार प्रेमशंकर तिवारी, याच्यावर इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा, २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला गावदेवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. लखन हा तिवारी कुटुंबातील एक सदस्य आहे, तो मुच्छड पानवाला नावाने दुकान चालवत आहे. मुच्छड पानवाला हे मुंबईतील प्रसिद्ध पान शॉप आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी येथे पान खाण्यासाठी येतात. केवळ सेलिब्रिटीच नाही तर मुंबईतील अनेक प्रसिद्ध उद्योगपती पानाची आवड पूर्ण करण्यासाठी येथे येतात. हे दुकान मुंबईत ७० च्या दशकापासून सुरू आहे आणि आता त्याचे नाव खूप प्रसिद्ध आहे. त्यांची स्वतःची वेबसाइट देखील आहे. हे पान शॉप ऑनलाइन फूड ऑर्डरिंग पोर्टलवरही ऑर्डर घेते. (Muchhad Panwala)

मुच्छड पानवाला हे दुकान श्यामचरण तिवारी यांनी सुरू केले होते. ते १९६१ मध्ये प्रयागराजहून मुंबईत आले आणि पान विक्रेता होण्यापूर्वी फळे आणि भाज्या विकायचे. त्यांचा मुलगा जयशंकर याने १९७० च्या दशकात दुकानाची जबाबदारी घेतली. श्यामचरण तिवारी यांच्या लांब मिशामुळे या दुकानाचे नाव ‘मुच्छड’पानवाला पडले. तिवारी कुटुंबातील प्रत्येकाने दक्षिण मुंबईत ‘मुच्छड पानवाला’ नावाने शाखा सुरू केल्या. अनेक दशकांपासून, हे दुकान बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक व्यवसायिक, उद्योगपतीचे आवडते पानांचे दुकान आहे. मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने बुधवारी छापे मारून लाखो रुपयांचे ई-सिगारेट आणि त्यांना लागणारे द्रव्य जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या लखन याने पोलिसांना दिलेल्या माहितीत ही सर्व ई-सिगारेट्स क्रॉफर्ड मार्केटमधून मन्सूर नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतल्या होत्या. (Muchhad Panwala)

(हेही वाचा – Team India : टीम इंडियातील खेळाडूंचा विधानभवनात होणार भव्य सत्कार!)

मुंबई एएनसीची कारवाई

यापूर्वी मुंबई गुन्हे शाखेच्या ANC (अँटी नार्कोटिक सेल) ने फेब्रुवारी २०२३ मध्ये मुच्छड पानवाला दुकानाच्या खेतवाडी शाखेवरही छापा टाकला होता. छाप्यात पोलीस पथकाने दुकानाच्या गोदामातून सुमारे १५ लाख रुपयांच्या ई-सिगारेट जप्त केल्या होत्या. याप्रकरणी मुच्छड कुटुंबातील शिवा पंडित उर्फ ​​शिवकुमार तिवारी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Muchhad Panwala)

एनसीबीची कारवाई

सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात मुच्छाड पानवालाचे नाव आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २०२१ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’ दुकानाचा मालक रामकुमार तिवारी याला अटक केली होती. सेलिब्रिटींना ड्रग्स विक्री केल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली होती. एनसीबीने सुशांत सिंग राजपूत ड्रग्स प्रकरणात काही सेलिब्रिटींना अटक केली. त्यावेळी मुच्छड पानवालाचे नाव समोर आले होते. त्यानंतर एनसीबीने रामकुमार तिवारीला या प्रकरणात अटक केली होती. रामकुमार तिवारी हा मुच्छड पानवाला कुटुंबातील एक सदस्य आहे. (Muchhad Panwala)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.