विनायक राऊतांच्या वाटेत आव्हानांची पेरणी, विश्वासू शिलेदार फोडण्यात शिंदे गटाला यश

126

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करणाऱ्या खासदार विनायक राऊतांना धडा शिकवण्यासाठी आता शिंदे गट ताकदीनिशी मैदानात उतरला असून, त्यांच्या मतदारसंघापासून कोकणात पक्षबांधणीस सुरुवात करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ते ज्यांच्या भरवश्यावर राजकारण करीत होते, त्या शिलेदाराला गळाला लावत शिंदेंनी राऊतांना राजकीयदृष्या कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे.

( हेही वाचा : मुंबईतील सौंदर्यीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी आयुक्तांनी लावली अधिकाऱ्यांमध्येच स्पर्धा)

निलेश राणे यांचा पराभव करीत २०१४ साली विनायक राऊत पहिल्यांदा खासदार झाले. ही लोकसभा निवडणूक लढविण्याआधी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात त्यांचा फारसा प्रभाव नव्हता. याऊलट कणकवली, देवगड, कुडाळचा काही भाग वगळता मतदार त्यांना ओळखतही नव्हते. पण रत्नागिरीत उदय सामंत, राजापुरात राजन साळवी आणि सिंधुदुर्गात दीपक केसरकर, वैभव नाईकांच्या साथीने सलग दोनवेळा त्यांनी बाजी मारली. आता शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यामुळे आधीच त्यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले असताना, सामोपचाराने घेण्याऐवजी त्यांनी टीकेचा सूर आळवल्याने शिंदे गटातील आमदारांचा संयमही सुटत चालला आहे. परंतु, शब्दाला शब्दाने उत्तर न देता राजकीय ‘ताकदी’ने उत्तर देण्याचे नियोजन शिंदे गटाकडून केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राऊतांच्या विश्वासू शिलेदारांना गळाला लावण्याचा धडाका सुरू करण्यात आला आहे.

राहुल पंडित हे त्यापैकी एक. विनायक राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे पंडित एकेकाळी त्यांचे स्वीय सहायकही होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. राऊत विजयी झाल्यानंतर त्यांना बक्षिस म्हणून रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदी वर्णी लावण्यात आली. शिवाय काही महिन्यांपूर्वी त्यांची जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. याच राहुल पंडित यांना आपलेसे करण्यात उदय सामंत यांना यश मिळाले आहे. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांची तातडीने रत्नागिरीच्या (दक्षिण) जिल्हाप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली असून, त्यापेक्षाही महत्त्वाचे पद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

ताकद कमी करण्याचा प्रयत्न…

उदय सामंत, दीपक केसरकर आणि राहुल पंडित यांच्या मदतीविना विनायक राऊत यांना लोकसभा निवडणूक जड जाईल, असे बोलले जात आहे. त्यांच्याकडे सध्या फक्त वैभव नाईक आणि राजन साळवी यांचेच बळ उरले आहे. दुसरीकडे, राणे परिवाराशी अजिबात सख्य नसल्यामुळे त्यांच्याकडून मदत मिळणे जवळपास अशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन राऊतांची ताकद आणखी कमी करण्यासाठी त्यांचा एकेक साथीदार फोडण्याची मोहीम सध्या शिंदे गटाने हाती घेतल्याचे समजते.

आदित्य ठाकरेंची सभा सुरू असताना ‘झटका’

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शुक्रवारी रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते. त्यांची सभा सुरू असतानाच शिंदे गटाने त्यांचे पदाधिकारी फोडत आणखी एक झटका दिला. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश मुकादम, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, नावडी विभागप्रमुख महेश देसाई, रत्नागिरी तालुका संपर्कप्रमुख मंगेश साळवी, माजी जिल्हा परिषद सभापती सहदेव बेटकर आणि जयगड विभागप्रमुख अनिकेत सुर्वे यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे रत्नागिरीत शिंदे गट आणखी भक्कम झाल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.